Sunday, July 19, 2026

Mojtaba Khamenei : ट्रम्प यांच्या स्वाक्षरीला काहीच किंमत नाही- मोजतबा खामेनेई

Mojtaba Khamenei : ट्रम्प यांच्या स्वाक्षरीला काहीच किंमत नाही- मोजतबा खामेनेई

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेवर जोरदार टीका करत मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने अलीकडेच झालेल्या शांतता कराराचे (एमओयू) उल्लंघन केले असून त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीला कोणतीही किंमत नाही. ती पूर्णपणे निरर्थक आणि अवैध आहे.  (Mojtaba Khamenei)

वृत्तानुसार, खामेनेई यांनी देशातील जनतेला पाठविलेल्या संदेशात हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, करार मोडून अमेरिकेने आपला खरा आणि उघड चेहरा दाखवला आहे. हे अमेरिकेच्या खोटेपणा, अतार्किकता, अविश्वासार्हता आणि आक्रमक स्वभावाचे आणखी एक ठोस उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.याचबरोबर खामेनेई यांनी इशारा दिला की, अमेरिका युद्ध भडकवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवत राहिली तर तिला मोठी किंमत मोजावी लागेल. त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे हल्ले सुरू राहिल्यास इराण आणि त्याची ‘प्रतिरोधक आघाडी’ (रेझिस्टन्स फ्रंट) अमेरिकेला असा धडा शिकवेल, जो ती कधीही विसरणार नाही.दोन्ही देशांदरम्यान झालेल्या शांतता करारानुसार ६० दिवसांच्या आत अंतिम करारासाठी चर्चा होणे अपेक्षित होते. या करारावर १८ जून रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, या करारानंतरही दोन्ही देशांतील तणाव वाढतच असल्याचे दिसून येत आहे. (Donald Trump)

इराणचे कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयक उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. सरकारी दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, इराणने या कराराअंतर्गत असलेल्या आपल्या सर्व जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी थांबवली आहे. गरीबाबादी यांनी अमेरिकेवर करारातील सर्व आश्वासने मोडल्याचा किंवा स्थगित केल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की, आता चर्चेसाठी कोणतीही जागा उरलेली नाही आणि इराणचे संपूर्ण लक्ष स्वतःच्या संरक्षणावर केंद्रित आहे. अमेरिकन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून अमेरिकेने शहाणपणाचा मार्ग स्वीकारावा, असेही त्यांनी म्हटले.दरम्यान, गेल्या आठवडाभरात अमेरिकेने इराणच्या दक्षिणेकडील प्रांतांमधील लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर अनेक हवाई हल्ले केले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी हे हल्ले करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील तसेच जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. शनिवारी कुवेत आणि बहरीन यांनी आपल्या हवाई संरक्षण यंत्रणांनी इराणकडून करण्यात आलेले हवाई हल्ले यशस्वीरित्या परतवून लावल्याची माहिती दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >