- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे
भारतातील गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांपैकी नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेही पापे नाहीशी होतात, असे स्कंद पुराणात सांगितले आहे. नर्मदेच्या तीरावर अनेक आश्रम व मंदिरे आहेत. नर्मदेच्या तीरावर मार्कंडेय, दुर्वास, वशिष्ठ, कृतू, अत्री मरीची, गौतम, गर्ग, शौनक आदी महान ऋषींनी तपश्चर्या केल्या आहेत. त्यामुळे तिच्या तीरावर अनेक आश्रम व अनेक तीर्थे निर्माण झाली आहेत. नर्मदा तीरावर जवळपास ३००च्या वर तीर्थक्षेत्रे आहेत. सर्वांचेच आपापल्या परीने महत्त्व आहे व सर्वच तीर्थे पापक्षालन करणारी आहेत. पैकी काही तीर्थ निर्मितीच्या कथा स्कंध पुराणात सांगितलेल्या आहेत.
प्रभासेश्वरतीर्थ :
एकदा सूर्य पत्नी प्रभेने शंकराची कठोर तपश्चर्या केली व मी पतीची लाडकी व्हावी असा वर मागितला, तसेच प्रभेने तेथे शिवलिंगाची स्थापना केली व या ठिकाणी आपण अंश रूपाने राहावे व हे तीर्थ प्रसिद्ध व्हावे, असा शंकराला वर मागितला लागेल. शंकराने तथास्तु म्हटले, तेव्हापासून हे स्थान प्रभासेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. प्रभास तीर्थाचे दर्शन घेणाऱ्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते असे स्कंद पुराण सांगते.
एरंडेश्वरतीर्थ :
पूर्वी अत्री नावाचे ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव अनुसया होते. ती महान पतिव्रता होती. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिच्या पतिव्रताची परीक्षा घेण्यासाठी एरंडी संगमावर आले. तिच्या पतिव्रतेच्या प्रभावाने ते प्रसन्न झाले. अनुसयेला वर मागण्यास सांगितले. अनुसयेने आपण तिघेही माझे पुत्र म्हणून जन्माला यावे अशी विनंती केली. देवांनी “देवांना गर्भावास नसतो, त्यामुळे तुला अयोनीज पुत्र होतील असा आशीर्वाद दिला.” त्यानुसार अनुसयेला ब्रह्मापासून चंद्र, शंकरापासून दुर्वास आणि विष्णूपासून दत्तात्रेय अवतार रूपाने झाले. तेव्हापासून हे एरंडेश्वर हे पापमुक्तीसह पुत्रप्राप्ती तीर्थ म्हणूनही प्रसिद्ध झाले.
संगमतीर्थ :
या ठिकाणी नर्मदेला गंगा व यमुना अशा येऊन मिळतात. या संदर्भात युधिष्ठिरने प्रश्न विचारला असता मार्कंडेय ऋषी म्हणाले, “पूर्वी त्रिपुरी नगरीत मातंग ऋषी राहत होते. एकदा त्यांच्याकडे सप्तर्षी ऋषी आले. मातंग ऋषींनी त्यांना भोजनाची विनंती केली. तेव्हा आम्ही गंगा यमुनेचे स्नान केल्याशिवाय भोजन करीत नाही, असे मातंग ऋषींना सांगितले. तेव्हा मातंग ऋषींनी ध्यान करून गंगा यमुनेचे आवाहन केले. त्याप्रमाणे त्या तिथे आल्या व संगमतीर्थ निर्माण झाले. सोमवती अमावस्सेला या तीर्थात स्नान करणाऱ्या मनुष्याच्या मागच्या व पुढच्या सात पिढ्यांचा उद्धार होतो, असे स्कंद पुराणात सांगितले आहे.
गांजलतीर्थ :
ज्याठिकाणी नर्मदेला दत्तात्रय नदी येऊन मिळते ते स्थान गांजल तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. या संदर्भात एक आख्यायिका आहे. एकदा पूर्वी चंद्रवंशी हरिकेश नावाचा राजा होता. तो फार दानधर्मी होता. एकदा त्याने शैल पर्वतावर तुंगभद्रा नदीच्या काठावर दहा हजार ब्राह्मणांना बोलावले व त्यांना दान देण्यासाठी एक लाख गाईसुद्धा आणल्या. नंतर यज्ञ करण्यासाठी त्याने रुद्र देवतेसंबंधी मंत्राने अग्नीला आवाहन केले. तेव्हा पाताळातील अत्यंत तेजस्वी अग्नी प्रकट झाला. पण त्याच्या प्रखरतेमुळे दहा हजार ब्राह्मण व एक लाख गाई जळून भस्म झाल्या. यामुळे राजाला अत्यंत दुःख झाले व त्याने अग्नीप्रवेष करून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले. त्यावेळी त्याला एका ऋषींनी कल्पग्रामात जाऊन हरिकेश होम करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजा कल्पग्रामात गेला व सरस्वतीला शरण गेला. सरस्वतीने त्याला सूर्यग्रहणाचे वेळी नर्मदेत कोटी तीर्थात स्नान करून शंकराची आराधना करून यज्ञ करण्यास सांगितले. राजाने त्याप्रमाणे करताच त्या ठिकाणी एक प्रवाह प्रकट होऊन तो नर्मदेत मिसळला. तोच “गांजाल संगम” नावाने प्रसिद्ध आहे. राजाने अग्नीमुळे मृत्यू पावलेल्या ब्राह्मणांच्या अस्थीचे त्या संगमात विसर्जन केले व त्यामुळे ब्राह्मणांना विष्णू लोक मिळाला. तसेच राजाने नर्मदेची आराधना केल्याने नर्मदेने त्याला या जलात स्नान व कर्म केल्याने सात जन्माच्या पापांचा नाश होईल, असा आशीर्वाद दिला.
जालेश्वरतीर्थ :
बलीचा पुत्र बाणासुर याने शंकराची आराधना केली. महादेवांनी त्याला एक दिव्य नगर दिले. तसेच ब्रह्मदेव व विष्णूनेही त्याला एक एक नगर दिले. बाणासुर जिकडे जाईल तिकडे हे नगर जात होते. म्हणून बाणासुराला त्रिपुरासुर असेही नाव पडले. हा त्रिपुरासुर देवांना त्रास देऊ लागला तेव्हा महादेवांनी त्रिपुरासुराला शैल पर्वतावर विराट रूप धारण करून ठार केले. त्रिपुरासुराचे जळून तीन तुकडे झाले. ते तुकडे शंकरांनी नर्मदा नदीत टाकले. त्याच ठिकाणाला जालेश्वर तीर्थ असे म्हणतात. हे प्रख्यात आहे. येथील पूजेमुळे ब्रह्म हत्या सारख्या पापातून ही मुक्ती मिळते. येथे मरण पावलेला मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. या ठिकाणी तील तर्पण केल्याने व पिंड दान केल्याने पितरांना तृप्ती लाभते.
सारस्वतीर्थ :
फारपूर्वी सप्त सारस्वत नावाचा गंधर्व होता. तो शिवभक्त होता; परंतु नंतर तो वाईट मार्गाला लागल्याने दुराचारी झाला. एकदा तो शिवाच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर गेला असता, नंदीने त्याला” तू केलेल्या पापी आचरणामुळे चांडाळ योनीत जन्म घेशील” असा शाप दिला. गंधर्वाने शाप मुक्तीसाठी विचारणा केली असता, व्यतिपात योगावर नर्मदेत स्नान करून शिवाराधना केल्यास तुला मुक्ती मिळेल असे सांगितले. गंधर्व पुढे चांडाळ झाला. त्याने नंदीने सांगितल्याप्रमाणे केल्याने शिव प्रसन्न झाले. त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने हे तीर्थ माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे व येथे चांडाळ व पापी लोकांनी येऊन दर्शन घेतल्यास ते सुद्धा पापमुक्त होऊन त्यांना स्वर्गप्राप्ती व्हावी असा असा वर मागितला. शिवाने तथास्तु म्हणून वर दिला. या ठिकाणी स्नान करून शंकराची पूजा करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो, तसेच कर्म करणाऱ्याला स्वर्गाची प्राप्ती होते, असा उल्लेख स्कंद पुराणात आहे.
सौभाग्यकरण तीर्थ :
दुर्भाग्यी मनुष्यही या ठिकाणी स्नान करून शंकर पार्वतीची पूजा करेल तर त्याला सौभाग्य लाभते. तसेच पतीसह कुलीन ब्राह्मणांची पूजा करणाऱ्या सुवासिनी स्त्रीला कधीही पती विरहाचे दुःख
होत नाही.
रोहिणी तीर्थ :
चंद्र पत्नी रोहिणीने नर्मदेच्या काठावर उग्र तपश्चर्या केली. तसेच तिने महिषासुरमर्दिनीचीही आराधना केली. देवी प्रसन्न झाल्यावर रोहिणीने “ मी चंद्राची सर्वात लाडकी पत्नी बनावी असा वर मागितला, तेव्हापासून रोहिणी चंद्राची प्रिय झाली. या तीर्थात स्नान करणारे पती व पत्नी एकमेकांना प्रिय होतात, अशी धारणा आहे.
चक्रतीर्थ :
राक्षसासोबत होणाऱ्या युद्धासाठी विष्णूंनी कार्तिकेचा या ठिकाणी देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला होता. या तीर्थावर स्नान करणाऱ्या मनुष्याच्या पापांचा नाश होतो तसेच जागरण करून विष्णूंची दीपदान देऊन पूजा करणाऱ्याला नरकयातना भोगाव्या लागत नाहीत, असा उल्लेख स्कंद पुराणात आहे.
याशिवाय कलहंसेश्वर, करंजेश्वर, कुंडलेश्वर, परशुरामेश्वर, आदित्येश्वर, मेघनादतीर्थ, खेटक तीर्थ आदी अनेक पापक्षालन करणारी तीर्थे नर्मदेच्या काठावर आहेत. नर्मदा परिक्रमा केल्याने या सर्व तीर्थांची परिक्रमा होते. म्हणून नर्मदा परिक्रमेला भाविक जनतेत भावनिकदृष्ट्या पवित्र, आदराचे व महत्त्वाचे स्थान आहे.