Sunday, July 19, 2026

PV Sindhu : जपान ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवून रचला इतिहास

PV Sindhu : जपान ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवून रचला इतिहास

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात तिने जपानच्या माजी विश्वविजेत्या अकेने यामागुचीचा 21-17, 21-17 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह जपान ओपन जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. (PV  Sindhu)

सिंधूसाठी हा विजय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या सैयद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेनंतर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील हे तिचे पहिले विजेतेपद आहे. तसेच 2019 मध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर सुपर 750 स्तरावरील तिचे हे पहिले मोठे जेतेपद आहे. त्यामुळे मोठ्या स्पर्धेतील विजेतेपदाची तिची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. (Japan Open badminton 2026)

उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफेईविरुद्ध 21-19, 15-10 अशी आघाडी घेतली असताना दुखापतीमुळे चेनने सामना अर्धवट सोडला आणि सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यापूर्वी सिंधू आणि यामागुची ( Akane Yamaguchi) यांच्यात एकूण 24 सामने झाले होते. त्यापैकी 14 सामने यामागुचीने, तर 10 सामने सिंधूने जिंकले होते. शिवाय मागील सहा लढतींपैकी पाच वेळा यामागुचीनेच सिंधूवर मात केली होती. मात्र, या वेळी सिंधूने आक्रमक खेळ, वेगवान स्मॅश आणि नेटजवळील अचूक फटक्यांच्या जोरावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. दोन्ही सेट 21-17 अशाच फरकाने जिंकत तिने एकही सेट न गमावता विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या ऐतिहासिक विजयामुळे सिंधूच्या जागतिक क्रमवारीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे गेल्या काही वर्षांत तिला संघर्ष करावा लागला होता. मात्र, जपान ओपनमधील या यशामुळे तिचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असून आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑलिम्पिकसाठी हा विजय तिच्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >