आनंद सोहळा

- परंपरा, द. वि. अत्रे


ग्यानबा तुकाराम’ अन् ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ हा नामघोष लाखो वारकऱ्यांच्या तोंडून ऐकायचा असेल, तर वारीचा सोहळा आषाढी व कार्तिकी एकदशीला डाेळे भरून पाहता येतो. वारकरी संप्रदाय हा सर्वांगीण भाविक भक्तांचा प्राण आहे. विठ्ठलाची वारी करणारा तो वारकरी. “वारकरी बाप रखुमादेवी वरी। विठ्ठलाचा वारकरी।।”


महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतवाणी या भूमीत झंकारत असते. पूर्व संचित म्हणा; की प्रारब्ध म्हणा, मला श्री क्षेत्र देहू सारख्या पवित्र ठिकाणी गेली साठ-पासष्ट वर्षे राहून वारीचा आनंद घेता आला. माझे वडील कै. विघ्नहर विष्णू अत्रेे दरवर्षी आषाढी-कार्तिकीला वारीबरोबर पंढरीला जात असत त्यामुळे, वारीचा आनंद नुसता न पाहता ती अक्षरश: जगलो आहे.


वारीचा उगम व विकास नेमका कसा झाला, याबद्दल मला उत्सुकता होतीच. माझे मित्र डॉ. सदानंद मोरे आणि त्यांचे वडील कै. श्रीधर महाराज देहूकर यांचा प्रदीर्घ सहवास मला मिळाला. त्यांच्याकडून वारी संबंधीचा इतिहास मला अभ्यासता आला. हा पालखी सोहळा श्री तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला. संत श्री तुकाराम महाराजांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यान् पिढ्या होती. महाराज म्हणतात, ‘पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत॥’ असा त्यांचा अभंग आहे. मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांच्यापासून तुकाराम महाराज हे आठव्या पिढीचे वंशज.
कान्होबा हे तुकाराम महाराजांचे अनुग्रहित, उत्तम कीर्तनकार व हरिभक्त होते. महाराजांच्या पूर्वजांपासून कान्होबापर्यंत घराण्यात अखंड वारी सुरू होती. आषाढी-कार्तिकी वारीचा उगम श्री विठ्ठल अवताराच्या उगमाबरोबरचा आहे. यानंतर पुंडलिकाला नारायणाने वर दिला, की जड जीवांचा उद्धार व त्यांच्या इच्छा पुरवाव्यात. हे सर्व विठ्ठल दर्शनाने मुक्त होतील. ही ऐतिहासिक परंपरा मला ‘श्री संत तुकाराम महाराज : उगम आणि विकास’ या पुस्तकातून वाचायला मिळाली. या पुस्तकाचे संपादन वै. श्रीधर महाराज देहूकर व डॉ. सदानंद मोरे यांनी केले आहे.


मात्र वारीला खरे रूप महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी प्रथम दिले. त्यांनी श्री तुकाराम महाराजांच्या पादुका व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून समारंभपूर्वक टाळ, चिपळ्या, मृदंग, पताका, गरुडटक्के आणि ‘ग्यानबा तुकारामा’च्या जयघोषात देहू ते पंढरपूर अशी वारी सुरू केली. ती वारी आजतागायत सुरू आहे.


श्री तुकाराम महाराजांच्या वेळेस वारीत फक्त चौदाशे टाळकरी होते. सर्व भाविक व वारकरी देहूला जमत. दर वद्य एकादशीला वारी आळंदीला जाते. तसेच आळंदीला श्री संत ज्ञानेश्वर मंदिर बोल्हाई असा उल्लेख आहे. वारी संबंधीचा हा इतिहास मला विद्वत् जनांच्या सहवासानेे व चर्चेने माहिती झाला.


वारीच्या दृष्टीने आषाढी व कार्तिकी ही वारकऱ्यांची महाव्रते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पंढरपूर हे ‘मोक्षपीठ’ असेच म्हणावे लागते. असा वारीचा सोहळा पंढरपूरच्या वाळवंटात डोळे भरून पाहता येतो. पंढरी म्हणजे वारकऱ्यांची भाविकांची मिरास होय. वारकऱ्यांच्या दृष्टीने हाच ‘महाराष्ट्र धर्म’ होय. श्री ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला आणि नामदेवांनी भिंती उभ्या केल्या; एकनाथांनी घुमट चढविला, तर श्री संत तुकाराम कळस झाले.

‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र म्हणत, अभंग गात टाळ, मृदंग, चिपळ्यांच्या तालात वारकरी तल्लीन होतात. विठ्ठलाच्या समचरणावर डोके ठेवण्याची आस व आंतरिक तळमळ वारकऱ्यांना लागलेली असते. पंढरपूर हेच त्यांच्या दृष्टीने काशी व वाराणसी होय. इतर तीर्थांची गरज भासत नाही.


पद, प्रतिष्ठा व जातपात या सर्व भेदांच्या पलीकडे वारी सोहळा अद्यापपर्यंत सुरू आहे. चारशे वर्षांपूर्वी संतांनी भाविकांना हाक मारली व त्यानंतर हा अपूर्व सोहळा दरवर्षी मोठ्या संख्येने वाढतच चालला आहे. मला आरोग्य खात्यात नोकरी करताना सन २००० ते २००५ मध्ये माऊलीच्या पालखीत वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व अध्यात्मिकता असा भक्तिभाव इतरत्र पाहायला मिळणे दुर्मिळच आहे. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, असेल त्या ठिकाणी स्नान करणे; नंतर बैठक मारून पडशीतून तुळशीमाळ, गंधगोळी, बुक्का, कपाळावर टिळा लावून हरिपाठ म्हणताना वारीतील भाविकांना मी पाहिले आहे. संतांनी भक्तीला वत्सलरूप दिले आहे. त्यामुळे विठ्ठलाला ‘माऊली’ म्हणतात. माऊलीकडे कोणतीही मागणी केली तरी ती पुरी होते ही वारीतील भावना. सर्व शीण जातो, हा वारकऱ्यांचा अनुभव.


ज्ञानदेव ज्ञानाचा सागर, तर तुकाराम महाराज भक्तिस्वरूप ज्ञान आिण भक्ती यांचा जणू संगमच आहे. या नामघोषात वारकरी डंुबुन राहतो. हा नामभक्तीचा सोहळा वारीनिमित्त जगण्यातच सर्व काही आहे. सारी अनुभूती त्यात आहे.
राम कृष्ण हरि...


Comments
Add Comment

आषाढ... परंपरेतला अन् प्रत्यक्षातला

- चिंतन; डॉ. साधना कुलकर्णी आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. इतर

एका गीतातून जन्मलेला चित्रपट

- स्मृतीपटल; अनिल तोरणे कोणा व्यक्तीला केव्हा आणि कोठे कशापासून प्रेरणा मिळेल हे सांगता येणार नाही. सुप्रसिद्ध

‘अबके हम बिछड़े तो शायद…’

- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे उर्दूतील शेरोशायरी अनेकदा रोमांसमधील अगदी तरल भावनांच्या सूक्ष्म छटाही सहज

नर्मदातीरावरील तीर्थांचा महिमा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भारतातील गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांपैकी नर्मदा नदीच्या केवळ

संकोच नव्हे, संवाद हवा!

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू आजही अनेक पालक मुलांशी लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे टाळतात. काहींना संकोच वाटतो,

दिलमें जुनून चाहिये...

स्पंदन-अश्विनी भोईर झटपट यश कसं मिळेल, यशाचा मूलमंत्र असे सांगणारी अनेक पुस्तकं आपल्याला बाजारात विक्रीला