Saturday, July 18, 2026

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा

मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या वृक्षतोडीच्या मोबदल्यात लावण्यात येणारी नवीन झाडे मुंबईतच लावावीत. तसेच, झाड पडून दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. यासोबत मुंबईतील झाडांचे वैज्ञानिक वर्गीकरण, सर्वंकष सर्वेक्षण आणि झाडांचे आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा तयार करण्यावर विविध वृक्षतज्ज्ञ, वनस्पतीशास्रज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची सखोल चर्चा झाली.

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वात काल (दिनांक १६ जुलै २०२६) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा जीवनशास्त्रज्ञ प्रा. संजय देशमुख, पर्यावरण अभ्यासक श्रीकांत इंगलकळीकर, वृक्षतज्ज्ञ वैभव राजे, अभिजीत सामंत, दीपक जयंत पाटील, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी तसेच उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी तसेच झाडांचे आयुर्मान आणि प्रकृतीबाबत परिस्थितीजन्य अभ्यास करण्यासाठी मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड ऑफिस) वनस्पतीशास्राच्या विद्यार्थ्यांकडून झाडांचे सर्वेक्षण करावे. वृक्षसंवर्धन आणि वृक्षांचे आरोग्य याबाबत वृक्षतज्ज्ञांच्या मदतीने माहिती पुस्तिका तयार करून ती सर्व संबंधितांना उपलब्ध करून द्यावी.

झाडांच्या फांद्या छाटणीसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करणे, त्यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करणे, आधुनिक उपकरणांचा वापर करणे आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच खासगी क्षेत्रातील झाडांच्या छाटणीसाठीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबत चर्चा झाली.

मुंबईत विविध ठिकाणी 'बायो-डायव्हर्सिटी झोन' विकसित करून स्थानिक जैवविविधतेला पूरक वृक्षलागवड करण्याची संकल्पना, रस्त्यालगत वृक्षलागवडीसाठी योग्य जागांची निवड, तसेच भविष्यातील हवामान बदलाचा विचार करून वृक्ष व्यवस्थापनाची दीर्घकालीन धोरणे तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच, शहरामध्ये योग्य जागांची निवड करुन बांबू लागवड वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली.

बैठकीत उपस्थित तज्ज्ञांनी झाडांच्या संरक्षणासाठी केवळ महानगरपालिकेने काम करुन भागणार नाही. तर, त्यासाठी नागरिकांचा सहभाग, जनजागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करून त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, मुंबईतील वृक्षांचे संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आणि एका बाजूला झुकलेल्या झाडांना यांत्रिक पद्धतीने टेकू देता येईल का, यावरही अभ्यासकांनी मत मांडले.

कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार

वृक्षांचे संगोपन कसे करावे, जमिनीपासून वर दिसणाऱ्या झाडासह जमिनीखालील मुळांचाही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याचा मुद्दा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी मांडला. लवकरच यावरही ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा