Wednesday, July 15, 2026

Semiconductor India : चिप उत्पादनाला चालना देण्यासाठी सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी

Semiconductor India : चिप उत्पादनाला चालना देण्यासाठी सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0 ला मंजुरी दिली असून, यासाठी एकूण 1.27 लाख कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सेमिकॉन 2.0 ला मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील सेमीकंडक्टर क्षेत्राला सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन पाठबळाची गरज ओळखून तसेच सेमिकॉन 1.0 अंतर्गत मिळालेल्या गतीला पुढे नेण्याच्या उद्देशाने सेमिकॉन 2.0 ला मंजुरी देण्यात आली आहे. भारताला जागतिक सेमीकंडक्टर नकाशावर स्थापित करण्याच्या दिशेने सरकारची वचनबद्धता अधिक बळकट करणे हे याचे उद्दिष्ट आहे. ( Semiconductor India)

सेमिकॉन 2.0 अंतर्गत भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहा प्रमुख स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या स्तंभात चिप डिझाइनला प्रोत्साहन देऊन भारतीय कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा (आयपी) विकसित करण्यासाठी मदत केली जाईल. दुसऱ्या स्तंभांतर्गत चिप निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री, रसायने, वायू आणि इतर साहित्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाईल. तिसऱ्या स्तंभात देशात अधिक सेमीकंडक्टर फॅब (चिप उत्पादन प्रकल्प) उभारण्यावर भर दिला जाईल.

चौथ्या स्तंभाअंतर्गत चिप पॅकेजिंग आणि चाचणी (एटीएमपी/ओएसएटी) उद्योग अधिक मजबूत केला जाईल. पाचव्या स्तंभात देश-विदेशातील प्रमुख संस्थांच्या सहकार्याने प्रगत चिप तंत्रज्ञानावरील संशोधन आणि विकासाला चालना दिली जाईल. सहाव्या स्तंभाअंतर्गत विद्यापीठे आणि उद्योग यांच्या सहकार्याने विद्यार्थी आणि अभियंत्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार केले जाईल. वैष्णव यांनी सांगितले की, यामुळे भारतातील संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था अधिक मजबूत होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेला नवी गती मिळेल. ( Semicon 2.0)

उल्लेखनीय म्हणजे, आतापर्यंत 1.64 लाख कोटी रुपयांहून अधिक एकूण गुंतवणुकीसह 12 उत्पादन युनिट्सना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या 12 प्रस्तावांपैकी मायक्रॉन, केन्स आणि सीजी सेमी या तीन कंपन्यांनी व्यावसायिक उत्पादन सुरू केले असून, आणखी एका कंपनीचे उत्पादन 2026 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. स्टार्टअप आणि एमएसएमईकडून आलेल्या 24 सेमीकंडक्टर डिझाइन प्रकल्पांना आर्थिक सहाय्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, तर 105 स्टार्टअप/एमएसएमईंना उद्योग-मानक इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन (ईडीए) साधनांपर्यंत प्रवेश उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा