Tuesday, July 14, 2026

Shrirampur : जेवणाच्या ऑर्डरवरील किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिकाचा खून; 'त्या' अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन

Shrirampur : जेवणाच्या ऑर्डरवरील किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिकाचा खून; 'त्या' अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन

Shrirampur : श्रीरामपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खूनप्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी शहरात सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या हत्येमागे मुंबईहून आलेल्या आरोपींचा किंवा कोणत्याही टोळीचा सहभाग नसल्याचे सांगत हा प्रकार केवळ जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. (Shrirampur News)

तीन आरोपी ताब्यात

शहरात या घटनेबाबत अफवा वाढल्याने या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर (Jayadatta Bhavar) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तपासाच्या प्रत्येक पैलूची माहिती देताना त्यांनी सांगितले की, या गुन्ह्यात केवळ तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. सुरुवातीच्या तपासात संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या अन्य दोन व्यक्तींचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना कोणताही तथ्याधार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Shrirampur News)

किरकोळ वाद क्षणांतच विकोपाला

तपासादरम्यान घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला. या हत्येमध्ये कोणत्याही प्रकारच्या धारदार किंवा घातक हत्याराचा वापर करण्यात आलेला नसल्याचे तपासातून समोर आले असून पोलिसांच्या तपासानुसार, जेवणाच्या ऑर्डरवरून झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याच वादातून हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्यामागे टोळीयुद्ध, बाहेरील गुन्हेगार किंवा पूर्वनियोजित कट असल्याच्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी स्पष्ट केले. (Shrirampur News)

आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे

या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश जाधव (Suresh Jadhav) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दुसरा आरोपी यश जाधव (Yash Jadhav) याच्याविरुद्धही यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी (Shrirampur Police) विशेष मोहीम सुरू केली आहे. सोमवारी विना क्रमांकाच्या वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली असून अनेक वाहने जप्त करण्यात आली. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे काम सुरू असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाने दिली. (Shrirampur News)

अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करत, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले. कोणत्याही गुन्ह्याबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडूनच घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या प्रकरणाचा तपास वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >