CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टाकले मागे
July 13, 2026 10:18 AM
CM Devendra Fadnavis
सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना मागे टाकले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत फडणवीस यांनी आता तिसरे स्थान पटकावले आहे. १३ जुलै २०२६ या तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ तब्बल २ हजार ४३१ दिवसांवर (सुमारे ६ वर्षे ७ महिने) पोहोचला असून, शरद पवार यांच्या २ हजार ४१२ दिवसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाचा रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढला आहे. फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अद्यापही सुरूच असल्याने त्यांच्या नावावरील हा विक्रम आगामी काळात दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ २०१४ ते २०१९ या कालावधीत सलग पाच वर्षांचा होता. त्यांनी आपला हा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे तो कार्यकाळ अवघ्या ६ दिवसांतच संपुष्टात आला होता. पुढे राजकीय स्थित्यंतरानंतर डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. १३ जुलै २०२६ पर्यंत फडणवीस यांच्या या तिसऱ्या कार्यकाळाला ५८६ दिवस पूर्ण झाले, असून हा कार्यकाळ सध्या अखंडपणे सुरू आहे.
याच्या उलट, महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य मानले जाणारे शरद पवार हे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले; मात्र राजकीय कारणांमुळे त्यांचे चारही कार्यकाळ मुदतपूर्व संपले आणि त्यांना एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. शरद पवार यांनी आपल्या चारही कार्यकाळात एकूण २ हजार ४१२ दिवस (सुमारे ६ वर्षे २२१ दिवस) राज्याचे नेतृत्व केले होते. त्यांना आता फडणवीस यांनी मागे टाकले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या सर्वकालीन यादीचा विचार केला, तर दिवंगत वसंतराव नाईक हे ४ हजार ९६ दिवसांच्या (११ वर्षे ७८ दिवस) प्रदीर्घ कार्यकाळासह आजही अव्वल स्थानावर विराजमान आहेत. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे २ हजार ६८६ दिवसांच्या (सुमारे ७ वर्षे १२९ दिवस) कार्यकाळासह दुसऱ्या स्थानावर आहेत. आता २ हजार ४३१ दिवसांच्या कार्यकाळासह देवेंद्र फडणवीस यांनी तिसरे स्थान पटकावले असून शरद पवार चौथ्या स्थानावर गेले आहेत.