Saturday, July 11, 2026

Kerala Boy Dies After Anaesthesia : साध्या जखमेवर भूल दिली अन् १८ महिन्यांच्या चिमुकल्याला हृदयविकाराचा झटका; केरळमधील संतापजनक घटना

Kerala Boy Dies After Anaesthesia : साध्या जखमेवर भूल दिली अन् १८ महिन्यांच्या चिमुकल्याला हृदयविकाराचा झटका; केरळमधील संतापजनक घटना

केरळ : केरळच्या कन्नूर (Keral Kannur) जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला आणि पालकांना हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि दुःखद घटना समोर आली आहे. ओठाला झालेल्या किरकोळ दुखापतीवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका १८ महिन्यांच्या चिमुकल्याला रुग्णालयात भूल (Anaesthesia) देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबाने डॉक्टरांवर वैद्यकीय हलगर्जीपणाचा (Medical Negligence) गंभीर आरोप केला असून, पोलिसांनी संबंधित महिला डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.

खेळताना पडला आणि ओठाला झाली दुखापत...

कन्नूरमधील एरामम-कुट्टूर येथे राहणारे टी. सूरज आणि विजिषा यांच्या कुटुंबावर हा मोठा आघात झाला आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा, देवांश शौर्य हा ५ जुलै रोजी घराबाहेर खेळत असताना अचानक पडला आणि त्याच्या ओठाला कट लागला. घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने मथरामनगलाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

टाके घालण्यासाठी दिली भूल आणि...

प्राथमिक उपचारानंतर, पुढील उपचारांसाठी आणि जखमेवर टाके घालण्यासाठी या चिमुकल्याला पय्यान्नूर येथील 'बेबी मेमोरियल हॉस्पिटल'मध्ये नेण्यात आले. उपचाराचा भाग म्हणून डॉक्टरांनी त्याला भूल दिली. मात्र, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, भूल दिल्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला आणि त्यानंतर त्याला शुद्धच आली नाही.

कन्नूरमध्ये हलवले, पण...

मुलाची प्रकृती खालावत असल्याचे पाहून, त्याला तातडीने कन्नूर येथील 'बेबी मेमोरियल हॉस्पिटल'च्या मुख्य शाखेत हलवण्यात आले. तिथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास या निष्पाप चिमुकल्याची प्राणज्योत मालवली.

डॉक्टरांवर बीएनएस (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल

आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे दुःखात बुडालेल्या कुटुंबाने डॉ. अंजली पोडुवल यांच्यावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा थेट आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी नवीन 'भारतीय न्याय संहितेच्या' (BNS) कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमात मानवी जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृतींबद्दल शिक्षेची तरतूद असून, यामध्ये दोषी आढळल्यास कमाल तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

हॉस्पिटलचा हलगर्जीपणाच्या आरोपास स्पष्ट नकार

दुसरीकडे, कोझिकोड, कन्नूर, पय्यान्नूरसह अनेक ठिकाणी शाखा असलेल्या 'बेबी मेमोरियल हॉस्पिटल'ने कुटुंबाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे की, "भूल दिल्यानंतर लगेचच या मुलाला अनपेक्षितपणे हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. त्यानंतर त्याला तत्काळ व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवून प्रगत उपचारांसाठी कन्नूरच्या शाखेत हलवण्यात आले होते." रुग्णालयाने पुढे असेही नमूद केले आहे की, योग्य डोस आणि संपूर्ण वैद्यकीय काळजी घेऊनही भूल दिल्यानंतर काही शरीरांमध्ये अशा प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. सर्व वैद्यकीय नियमांचे आणि मान्य असलेल्या उपचार पद्धतींचे तंतोतंत पालन करून मुलाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला होता, असा दावा रुग्णालयाने केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >