Wednesday, July 8, 2026

Nashik : चोर चावडी धबधब्याच्या खोल डोहाने घेतला १८ वर्षीय तरुणाचा बळी; २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर एसडीआरएफला मृतदेह सापडला

Nashik : चोर चावडी धबधब्याच्या खोल डोहाने घेतला १८ वर्षीय तरुणाचा बळी; २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर एसडीआरएफला मृतदेह सापडला

Nashik : पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. देवळा (Deola) तालुक्यातील चोर चावडी धबधब्याजवळील (Chor Chavdi Waterfall) खोल डोहात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर एसडीआरएफच्या (SDRF) पथकाला अखेर सापडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अंधार, गढूळ पाण्यामुळे शोधकार्यात अडथळा

ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले. मात्र, संध्याकाळचा अंधार, डोहाची प्रचंड खोली, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि गढूळ पाण्यामुळे शोधमोहीमेत अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे रात्री उशिरा शोधकार्य स्थगित करण्यात आले. मात्र, तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रभर सज्ज राहिल्या.

अथक आणि संयमी प्रयत्नांनंतर शोध

आज सकाळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तब्बल २९ सदस्यीय विशेष पथकाने घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम हाती घेतली. अत्याधुनिक पाणबुडी उपकरणे, पाण्याखालील कॅमेरे आणि विशेष बचाव साहित्याच्या साहाय्याने डोहातील विविध भागांची बारकाईने तपासणी करण्यात आली. अनेक तासांच्या अथक आणि संयमी प्रयत्नांनंतर अखेर खोल डोहातून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले. शोधमोहीमेदरम्यान एसडीआरएफचे जवान, देवळा पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी ठाण मांडून संपूर्ण कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवले. विविध यंत्रणांमधील समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही अवघड मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली.

क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बजरंग रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. काही क्षणांपूर्वीपर्यंत हसत-खेळत असलेला मुलगा आता कायमचा निघून गेल्याची जाणीव कुटुंबीयांना असह्य ठरत होती.

धोकादायक ठिकाणी जाणे टाळा

या घटनेनंतर चोर चावडी धबधबा आणि परिसरातील खोल डोहांमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि खोल पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे किंवा पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती या दुर्दैवी घटनेतून आली आहे. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, खोल पाण्यात उतरू नये आणि सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.

या प्रकरणाचा पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, दुर्घटनेच्या नेमक्या परिस्थितीचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >