स्वातंत्र्याची किंमत...

कथा-रमेश तांबे


 

एक होतं माकड. अंगानं होतं राकट. एका जंगलात राहायचं, ताजी ताजी फळं खायचं. झाडावर राहायचं, झाडावरच झोपायचं. पण माकड होतं खूपच आळशी आणि लोभी. ताजीताजी फळं खायला त्याला आवडायची. पण ती मिळवण्यासाठी मेहनत, कष्ट करण्याची त्याची तयारी नव्हती. त्याला वाटायचं या इथे जंगलात राहण्यापेक्षा आपण शहरात जाऊ, तिथे माणसं आपल्याला खाऊ पिऊ घालतील.


मग एक दिवस त्याने जंगल सोडून थेट शहरच गाठलं. तिथली गर्दी बघून तो हरखून गेला. उंच उंच इमारती, रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या अन् दुकानाच्या रांगा! हे सारे पाहून त्याला खूपच आनंद झाला. मग थोड्या वेळानंतर त्याला लागली भूक. काही खायला मिळतंय का हे पाहण्यासाठी तो फिरफिर फिरला. झाडे शोधून पार दमला. पण कुठं फळं नाहीत, की कुठं पाणी नाही. तो दुकानांसमोर उभा राहिला की दुकानदार त्याला हाकलून द्यायचे. मग तो इमारतीवर चढायचा, खिडकीतून डोकावून खायला मागायचा. पण लोक त्याला बघून घाबरायची, दारं खिडक्या बंद करायची. असंच फिरता फिरता माकड पोहोचले राणीच्या बागेत. राणीच्या बागेत त्याला जंगली प्राणी दिसले. त्याला खूप आनंद झाला. तो आनंदाने ओरडू लागला, त्याला पिंजऱ्यातले प्राणी म्हणाले, “अरे चूप! आरडाओरडा करू नकोस, नाही तर ती माणसं तुलाही पकडून पिंजऱ्यात ठेवतील!” ते काय बोलतात हे माकडाला काही कळेना, इथल्या प्राण्यांची भाषा त्याला समजेना.
मग तेवढ्यात त्याला दिसली माकडे. ती एका मोठ्या पिंजऱ्यात बसून खात होती, चणे, फुटाणे आणि केळी! त्यांना बघताच सगळी माणसं जमली माकडं बघायला. पण पिंजऱ्या बाहेरच्या माकडाला पिंजऱ्यात शिरायचं होतं आणि आतल्या माकडांना बाहेर यायचं होतं. बाहेरच्या माकडाला काही कळेना, पिंजऱ्यातल्या माकडांचं काही समजेना! छानपैकी खायचं, प्यायचं, कष्ट न करता गोडगोड फळं खायची, छोट्याशा तलावात अंघोळ करायची! किती मस्त जीवन आहे त्यांचं. माकड विचार करीत बेसावध बसलं होतं.


तेवढ्यात काय झाले. बागेचे अधिकारी तिथे आले. त्यांना वाटले एक माकड निसटले. मग अधिकाऱ्यांनी माकडाला केळी, सफरचंद, संत्रे अशी फळे द्यायला सुरुवात केली. माकडदेखील दोन दिवसांपासून उपाशी होते. ते पिंजऱ्यावरून खाली उतरले. अन् फळे खाण्यात दंग झाले. त्याने भरपेट फळे खाल्ली, भरपूर पाणी प्यायला अन् टुणकन उडी मारून झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. पण तोपर्यंत त्याच्या गळ्यात दोरी बांधली गेली होती.आता माकडाची रवानगी त्याच माकडांच्या सोबत करण्यात आली. एका भल्यामोठ्या पिंजऱ्यात! तिथे त्याला रोज खाणेपिणे मिळत होते. पण बाहेर मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य त्याला आता उरले नव्हते. आता रोज फक्त खायचं, प्यायचं अन् गपगुमान पडून राहायचं, बघायला आलेल्या पोरासोरांनी मारलेले दगड हसत हसत झेलायचे एवढंच काम त्याच्याकडे उरलं होतं. चार-पाच दिवसांतच माकड एका जागी बसून कंटाळून गेलं. स्वातंत्र्याची किंमत आता त्याला कळून चुकली होती. आरामात, बिनाकष्टाचे खाणं मिळवण्याच्या नादात आपण आपले जंगलातले सुंदर जीवन गमावले आहे याची त्याला जाणीव झाली.

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व