कलाकार शेवटी माणूसच असतो ना...

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ



सहज काही चाळता चाळता एक मुलाखत समोर आली, जेणेकरून माझ्याही मनातला एक मोठा गैरसमज दूर झाला. आपण नेहमीच काही छोटे छोटे व्हिडीओ पाहत असतो ज्याच्यात एखादी हीरोइन किंवा हिरो समोरच्या व्यक्तीवर, पत्रकारांवर चिडताना, ओरडताना दिसतात. त्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तीच दृश्य आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात आणि आपलाही त्यांच्याविषयीचा गैरसमज आणखी वाढत जातो. या छोट्याशा क्लिप्स अगदी दहा सेकंदांपासून तीस-चाळीस सेकंदांपर्यंतच्या असतात. पण त्याच्या आधीची घटना आपल्याला माहीत नसते किंवा ती घटना कापून पुढचा भाग दाखवला जातो जो आपण परत परत पाहत राहतो.



हीरो-हीरोइनची क्रेझ, आकर्षण बहुतेकांना असते. आजच्या काळात त्यांच्या सहीपेक्षा त्यांना फोटो महत्त्वाचा वाटतो. हा फोटो फक्त त्यांचा त्यांना नको असतो, तर त्यांच्याबरोबरीने आपलाही काढलेला फोटो हवा असतो. मीही त्याला अपवाद नाही म्हणा...! तर त्या फोटोसाठी माणसे नेमके काय करतात हे मला या मुलाखतीतून पाहायला मिळाले. ही मुलाखत होती सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांची. एक जवळची व्यक्ती आजारी होती म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्या हॉस्पिटलच्या आवारात कोणीतरी त्यांच्याबरोबर फोटो काढावेत, अशी कोणीतरी त्यांना विनंती केली. कलाकार शेवटी माणूसच असतो ना... एक जवळचा व्यक्ती आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा त्यावेळेसची त्यांची मानसिकता त्यांच्या भावभावनांचा विचार नको का करायला? बरं इथे या उत्साही फोटो काढून घेणाऱ्यांना ‘नाही’ म्हटले तर ते रागावतात. वाटेल तसे त्या कलाकारांविषयी व्यक्त होतात. गिरीजा ओक यांनी सांगितले की, स्मशानातसुद्धा आपले चाहते फोटो मागतात. त्यांची ही मुलाखत चालू असताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या पायाला बँडेज आहे कारण फोटो काढण्यासाठी जवळ येताना, धडपडीत त्यांच्या पायावर एका बाईने स्वतःच्या हाय हिल्सचा पाय गिरजा यांच्या नखावर दिला आणि त्यामुळे नख फाटून त्याचे दोन भाग झाले. त्यांनी हे त्या व्यक्तीला कळूसुद्धा दिले नाही कारण तिने जाणीवपूर्वक केलेले ते कृत्य नव्हते त्यामुळे तिची चूक नव्हती. तिला बोलण्यात अर्थ नव्हता. ही घटना घडताना आणि घटना घडून गेल्यावरसुद्धा ती व्यक्ती याविषयी अनभिज्ञ होती की गिरीजाच्या पायाला तिच्यामुळे दुखापत झाली आहे.



गिरीजा ओक यांनी पुढे सांगितले की, जेव्हा काही माणसे आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी येतात तेव्हा त्यांचे केस ओढले गेलेले आहेत, साडीवरच्या पिना निघालेल्या आहेत, साडीचा पदर खेचला जाऊन साड्या फाटलेल्या आहेत. त्या क्षणी आपल्याला कितीही त्रास झाला तरी कलाकार म्हणून समाज आपल्याकडे पाहात असतो तेव्हा आपल्याला बोलता येत नाही. आसपास गर्दी असते. नेमके कोणाकडून हे घडलेलं आहे हे त्यांना आणि आपल्यालाही कळत नाही. अशा क्षणी चिडून मला कोणाला भेटायचं नाही असे म्हटले किंवा माझ्या सुरक्षिततेची काळजी मला वाटली तर या मी माज का दाखवतीये, हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे! हे जे माझ्याबाबतीत घडते ते इतरही कलाकारांबाबतीत घडत असते. त्यामुळे कलाकार चिडतात किंवा चिडून एखादा कमी जास्त शब्द बोलतात, एवढीच गोष्ट व्हायरल होते पण ते का तसे वागतात हे कधीच समाजासमोर येत नाही.गिरीजा ओक यांनी अत्यंत साध्या शब्दांत प्रामाणिकपणे कलाकारांची बाजू मांडलेली आहे यातून खरोखरी आपण बोध घेतला पाहिजे!



मला आठवतेय, एका हॉटेलमध्ये रात्री साधारण साडे दहा-पावणे अकराच्या सुमारास आम्ही कॉफी प्यायला गेलो होतो. तिथे हिंदी सिनेमा सृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आपल्या पत्नी आणि मुलांसह शांतपणे बसून भोजन करत होते. अचानक एक मुलींचा गलका त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी या अभिनेत्यांशी बोलायला सुरुवात केली. ती वेळ खरं तर त्यांची स्वतःची वेळ होती, आपल्या कुटुंबीयांना द्यायची वेळ होती. मुख्य म्हणजे एखादा माणूस अन्न चावतोय अशा विचित्र स्थितीमध्ये त्या मुलींचा मित्र या आपल्या मैत्रिणींचा त्याच्यासोबतीचा फोटो काढायचा प्रयत्न करत होता. त्यांनी या मुलींना सांगितले की, कृपया मी जेव्हा घास चावतोय तेव्हा तरी कमीत कमी तुम्ही फोटो काढू नका. माझे जेवण होऊ द्या, मग तुम्ही माझ्याबरोबर हवे तेवढे फोटो काढा. तरीही समोरच्याचे फोटो काढणे चालूच होते आणि या मुलींचे उगाचच त्यांना चिकटणे! त्यांची पत्नी प्रचंड चिडली आणि ती म्हणाली, “आम्हाला थोडा वेळ आमच्याही आनंदासाठी मिळू द्या की...!”
हे कदाचित त्या मुलींनी ऐकले; परंतु एका टेबलाभोवती अनेक मुली जमल्या आहेत आणि फोटोसेशन चालू आहे पाहून त्या हॉटेलमधील इतर कुटुंबीयसुद्धा आपापले मोबाईल सरसावून तिथे फोटो काढण्यासाठी पोहोचले. आत्तापर्यंत जो या मुलींशी संवाद चालू होता तो कोणीच ऐकलेला नव्हता त्यामुळे त्यांना त्याविषयीची काहीच माहिती नव्हती. प्रत्येक वेळेस नव्याने, नवीन लोकांना ही माहिती देणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. थोडा वेळ आनंदाने घालवण्यासाठी ते तिथे आलेले होते; परंतु त्यांच्या आनंदावर या सगळ्या माणसांनी विरजण टाकलेले होते. शेवटी ते अर्धवट झालेल्या जेवनातून, ताटावरून उठून निघून गेले. ते जातानासुद्धा काही माणसे त्यांच्या आसपास पळत पळत ज्या कोनातून फोटो मिळतोय त्या कोनातून ते काढत होते.



प्रत्येक कलाकाराला स्वतःचे स्वतंत्र आयुष्य असते, ते त्यांना त्यांच्या पद्धतीने मिळायलाच हवे. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याची कृती त्यांच्या चाहत्यांनी कृपया करू नये आणि हे सांगण्याची वेळ, कमीत कमी त्यांच्यावर येऊ नये, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यावी.pratibha.saraph@gmail.com

Comments
Add Comment

दाट धुक्यामुळे काही दिसेनासे झाले तेव्हा...

- अनिल तोरणे, स्मृतीपटल आपल्या ‘काला बाजार’ या चित्रपटाच्या बाह्यचित्रीकरणासाठी देव आनंद निघाले पण दाट

बाई इतिहास नव्हेत; भविष्याची दिशा...

- प्रा. मधुकर कुलकर्णी; श्रद्धांजली विजया मेहता यांच्या प्रयोगशीलतेचा अर्थ केवळ रंगमंचावरील नव्या

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा...

हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट १९७६ साली म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी आला होता! दिग्दर्शक होते वसंतराव तथा

नर्मदावतरण

भालचंद्र ठोंबरे, महाभारतातील मोतीकण  भारतात गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी या नद्यांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच

जीव घेण्याइतका राग येतो कुठून?

डाॅ. स्वाती गानू,आनंदी पालकत्व एखाद्या तरुणाच्या मनात असा कोणता विचार जन्म घेतो, की तो शांतपणे दुसऱ्या माणसाचा

एक स्वच्छ सुंदर नात विणूया...

अश्विनी शिंदे - भोईर,स्पंदन दुपारचं उन्हाळ्यातलं कडक ऊन. खरं तर जून महिन्यातला हा दिवस. पण पावसाळा लांबल्यामुळे