Friday, July 3, 2026

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह जाहिरातींची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) मेटाकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर अशा प्रकारच्या जाहिराती कश्या दिसल्या, त्या रोखण्यासाठी कंपनीने कोणती पावले उचलली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार आहे, याबाबत मेटाकडून माहिती मागवली जाणार आहे. (Child Safety)

दरम्यान, सरकारने व्हॉट्सॲपच्या प्रस्तावित 'युझरनेम फीचर'बाबतही मेटाला नोटीस बजावली आहे. या फीचरमुळे माहिती तंत्रज्ञान कायद्याशी संबंधित कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात, याबाबत सरकारने स्पष्टीकरण मागितले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या विषयावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत व्हॉट्सॲपने भारतात युझरनेम फीचर सुरू करू नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, या फीचरबाबत सविस्तर माहिती तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश मेटाला देण्यात आले आहेत.

भारत हा व्हॉट्सॲपसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून देशात सुमारे 50 कोटी वापरकर्ते आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता, सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन याबाबत सरकार विशेष लक्ष ठेवून आहे.

सरकारच्या या दोन कारवायांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा, नियमांचे पालन आणि वापरकर्त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा