Tuesday, June 30, 2026

Uday Samant : पाषाण तलाव सांडपाणी प्रकल्पातील त्रुटींची होणार चौकशी!

Uday Samant : पाषाण तलाव सांडपाणी प्रकल्पातील त्रुटींची होणार चौकशी!

१५ दिवसांत केंद्र सुरू न केल्यास पिंपरी-चिंचवडमधील इतर सोसायट्यांचेही नळ कनेक्शन कापणार - मंत्री उदय सामंत

मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील (STP) त्रुटी आणि गृहनिर्माण संस्थांमधील बंद केंद्रांविषयी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप आमदार उमा खापरे यांनी महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला प्रश्न सप्तहित केला. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्योग मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant) यांनी शासनाच्या वतीने सविस्तर उत्तरे देत वस्तुस्थिती सभागृहात मांडली.

आमदार उमा खापरे यांनी पुणे शहरातील औंध-पाषाण, सुतारवाडी येथील पाषाण तलावामध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा सभागृहात मांडला. या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात अनेक त्रुटी असून, त्यामुळे पाण्याचे पुरेसे शुद्धीकरण होत नसल्याची बाब एप्रिल २०२६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे का? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला होता. यावर शासनाकडून सुरुवातीला "हे खरे नाही" असे लेखी उत्तर आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एका बाजूला त्रुटी नसल्याचे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला पाषाण येथील प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी जागा उपलब्ध नाही, तसेच भविष्यात इतर ठिकाणी प्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे उत्तर द्यायचे, या परस्परविरोधी उत्तरांमुळे एकाच प्रश्नात दोन वेगवेगळे विषय आल्याने त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. याशिवाय, त्यांनी पाषाण तलावाच्या ठिकाणी क्षमता वाढवण्यासाठी जागा कधी उपलब्ध होणार आणि या एसटीपी प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाची देय रक्कम किती आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, सांडपाणी शुद्धीकरणाच्या या कामासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी 'प्राइम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड'ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 'मेसर्स परशुराम कन्स्ट्रक्शन'ला ४ कोटी ३१ लाख रुपयांचे टेंडर देण्यात आले होते. सुरुवातीला सहा वेळा मागवलेल्या निविदा अपात्र ठरल्यामुळे फेरनिविदा काढून हे काम देण्यात आले होते. मेंटेनन्ससाठी काही कालावधीकरिता हा एसटीपी प्लांट बंद होता ही बाब खरी असली, तरी सध्या हा प्रकल्प पूर्णपणे सुरू आहे. मात्र, या कामाची ६ महिन्यांची मुदत, २ महिन्यांचा ट्रायल रन, ३ वर्षांची देखभाल-दुरुस्ती आणि २ वर्षांचा डिफेक्ट लायबिलिटी पिरीयड (Defect Liability Period) यामध्ये काही फेरफार किंवा पाठीमागे-पुढे झाले आहे का, याची नक्कीच चौकशी केली जाईल, असे सकारात्मक आश्वासन मंत्र्यांनी सभागृहात दिले.

१५ दिवसांत केंद्र सुरू न केल्यास इतर सोसायट्यांवरही कारवाई

आमदार उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमधील (Societies) बंद सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचाही विषय मांडला. पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायट्यांमध्ये १२६ शुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद असून यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर महानगरपालिका नेमकी काय कारवाई करत आहे, तसेच ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, याचा सविस्तर खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील १२६ पैकी ६२ सोसायट्यांच्या यंत्रणेला प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ सोसायट्यांचे नळ कनेक्शन (Water Connections) आतापर्यंत कापण्यात आले आहेत. उर्वरित बंद केंद्रांच्या बाबतीत महानगरपालिकेला आजच अंतिम नोटीस बजावण्याचे निर्देश दिले जातील. संबंधितांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल आणि या १५ दिवसांत जर एसटीपी केंद्र सुरू झाले नाहीत, तर त्यांचेही नळ कनेक्शन तातडीने कट करण्याचे कठोर निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा