Tuesday, June 30, 2026

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या मनुष्यबळाऐवजी (Ford Employees) एआयच्या मदतीने कामकाज अधिक वेगवान आणि कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, एआयच्या मर्यादा अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अमेरिकेतील वाहन उत्पादक कंपनी फोर्डला याचा फटका बसला असून, उत्पादन प्रक्रियेत आलेल्या अडचणींमुळे कंपनीला कामावरून कमी केलेल्या अनुभवी अभियंत्यांनाच पुन्हा सन्मानाने कामावर बोलवावे लागले आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी फोर्डने उत्पादन प्रक्रियेत एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचा निर्णय घेतला होता. एआयच्या मदतीने उत्पादन अधिक अचूक होईल, खर्चात कपात होईल आणि कामाचा वेग वाढेल, असा कंपनीचा अंदाज होता. या धोरणाचा भाग म्हणून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत एआय अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरला नाही. वाहनांच्या उत्पादनादरम्यान निर्माण होणाऱ्या दर्जासंबंधी त्रुटी ओळखणे आणि त्यांचे प्रभावी निराकरण करण्यात एआयला मर्यादा आल्या. परिणामी उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला.

ही परिस्थिती लक्षात घेत फोर्डने पुन्हा अनुभवी मनुष्यबळाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीने ३५० हून अधिक अनुभवी अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले असून, त्यापैकी अनेक कर्मचारी यापूर्वी याच कंपनीत कार्यरत होते आणि त्यांनाच आधी सेवामुक्त करण्यात आले होते. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एआय कितीही प्रगत झाले, तरी प्रत्यक्ष अनुभव, समस्या सोडवण्याची क्षमता आणि निर्णयक्षमता यांसारख्या मानवी कौशल्यांची जागा तंत्रज्ञान पूर्णपणे घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. फोर्डच्या या अनुभवामुळे एआय आणि मानवी कौशल्य यांचा समतोल राखण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >