राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हाय-सिक्युरिटी प्लेट बंधनकारक; एजंटच्या आमिषाला बळी न पडण्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांचे आवाहन
मुंबई : राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची आज अंतिम मुदत (३० जून) असून, उद्यापासून (१ जुलै) विना HSRP नंबर प्लेट धावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून ठोस आणि कडक कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली आहे. "आम्ही आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही," अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. आज ३० जून रोजी ही मुदत संपुष्टात येत असल्याने उद्यापासून परिवहन विभाग आणि ट्रॅफिक पोलिसांकडून राज्यभर धडक मोहीम हाती घेतली जाणार असून, ज्या वाहनधारकांनी अजूनही ही नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना आता मोठ्या दनात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
देशविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी सुरक्षेचे कवच
या हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट्सचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ज्या पद्धतीने राज्यात आणि देशात देशविरोधी कारवाया घडतात, ते पाहता सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने HSRP नंबर प्लेट्स अत्यंत आवश्यक आहेत. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये देशविरोधी घटकांनी केलेल्या हल्ल्यांनंतरच प्रत्येक वाहनावर ही हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र व राज्य पातळीवर घेण्यात आला होता. या आधुनिक नंबर प्लेट्समुळे संशयास्पद किंवा चोरीच्या वाहनांची ओळख पटवणे आणि राज्याची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे प्रशासनाला सोपे होणार आहे, त्यामुळे याकडे केवळ एक नियम म्हणून न पाहता राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून पाहिले पाहिजे.
एजंटच्या आमिषाला बळी पडू नका; मंत्र्यांचे अधिकृत नोंदणीचे आवाहन
परिवहन मंत्र्यांनी राज्यातील जनतेला सतर्क करताना आवाहन केले आहे की, वाहनधारकांनी केवळ शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच (Official Website) HSRP साठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणूक करून घेऊ नये. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन आणि देश सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ज्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने ऑनलाईन नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.






