बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड



बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका मराठी विभागाची प्रमुख होते. शाळेतल्या मुलांवर मी माझ्या प्राजक्ता, निशिगंधावर जसे प्रेम केले, तसेच पुरेपूर माझ्या वि‌द्यार्थ्यांवर केले. राऊंडवर असताना बाळूला मी खोड्या करताना पाहिले.

“बाळू, शिक्षक वर्गात यायला काही मिनिटे जातात रे! अशा खोड्या करू नकोस पुन्हा.”
“बाई, खरं सांगू? माझं अभ्यासात लक्ष लागत नाही.”
“चाळीतला गोंगाट नकोसा वाटतो का रे?”
“हो बाई. तुम्हांला कसं कळलं, मी चाळीत राहतो ते.”
“मला ठाऊक आहे ते.”
“कसं पण?”
“प्रत्येक विद्यार्थी मला माझ्या मुलींइतकाच प्रिय असतो रे बाळू!”
“मी पण तुम्हाला आवडतो?”
“खूप आवडतोस रे बाळू.”
तो आश्चर्याने माझ्याकडे बघत राहिला. त्याला वाटणारे नवल त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होते.
“कोणाला काही आवडावे असं काही नाही माझ्यात.”
“तुझ्याजवळ एक निरागस मन आहे. मला ते फार आवडतं. खूप खरा आहेस तू. पण खोड्यांनी आयुष्य फुकट घालवतोस.”
“मग मी काय करू बाई?”
“अभ्यास कर. पूर्व परीक्षा महिन्यावर आली रे बाळू!”
“अभ्यासात लक्ष लागत नाही बाई. चाळीतलं वातावरण एकदम भयाण, भकास आहे.”
“बाळू, तुला एक सुचवू?”
“तुम्ही माझ्या आवडत्या टीचर आहात.”
“मग माझ्या खोलीत अभ्यास कर.”
“तुम्हाला चालेल?”
“पळेल.”
“खरंच बाई?”

“अगदी खरं बाळू. आता पूर्व परीक्षा झाली की एसएससी परीक्षा बोर्ड जाहीर करेल तेव्हा होईल. तू सारा वेळ माझ्या खोलीत बसून शांतपणे अभ्यास कर. नक्की छान पास होशील. आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के असतो नेहमी. मला विश्वास आहे की, तू तो कायम राखशील.”
“हो बाई! मी वचन देतो, मी निकालाला काळं फासणार नाही.”
“माझं एकही मूल रडत घरी गेलेलं मला सहन होत नाही रे बाळू.”
“मीही निकाल सिद्ध करीन.”

तसा बाळू रोज माझ्या खोलीत बसून अभ्यास करू लागला. माझ्या खोलीत अजून एक पर्यवेक्षक बसत असत. ते होते, डॉ. बी. आर. तिवारी. हिंदी विभाग त्यांच्याकडे होता.
मी किंवा ते, कोणीतरी खोलीत असेच असे. त्यामुळे बाळूला पळून जाणे शक्य नव्हते. हळूहळू बाळूला अभ्यास आवडू लागला. तो जोमाने अभ्यास करू लागला.
“अक्षर चांगले काढ!” मी नित्यनेमाने त्याचा अभ्यास तपासत असे. तोही लढत होता. नव्याने जगू पाहत होता.
“बाई, मला ड्रायव्हिंगची फार आवड आहे.”
“मी तुला ड्रायव्हिंग स्कूलला घालीन. फक्त वयाची अट पूर्ण कर म्हणजे झालं.”
एसएससी झालं. पहिल्या फटक्यात बाळू पास झाला. माझ्या सासूबाईंनी त्याच्या यशची घरी पार्टी केली. गोड शिरा नि दुधी हलवा बाळूला खायला घातला.
यथावकाश बाळू गाडी चालवू लागला. त्याला ते कौशल्य उपजत प्राप्त होते बहुधा!
एक दिवस भर पावसात विक्रोळी ते माझं घर, मुलुंड येथे, गाड्या बंद पडल्या; म्हणून शाळेच्या गाडीने त्याने मला अलगद नेऊन सोडले. मी धन्य झाले.
बेस्टच्या व्यवस्थापकांचा एकदा शाळेत फोन आला.
“वाड बाई चांगला ड्रायव्हर पाठवा!” मी बाळूला धाडले. तो पहिल्या फटक्यात बेस्टचा ड्रायव्हर झाला! असा बाळू!
Comments
Add Comment

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

नेमकी जागा...

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर एका कारखान्यात घडलेली गोष्ट... सकाळचे ७ वाजले. पहिल्या पाळीचे सगळे कामगार कामावर आले.

प्रामाणिकपणा

जीवनगंध-पूनम राणे शाळा सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी होते. सरला मॅडम आपल्या घराची साफसफाई करण्यात गुंग होऊन