Thursday, June 25, 2026

Mangal Prabhat Lodha : SIR प्रक्रियेदरम्यान मशिदींमध्ये बैठका ; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

Mangal Prabhat Lodha : SIR प्रक्रियेदरम्यान मशिदींमध्ये बैठका ; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

तात्पुरत्या स्थलांतरित नागरिकांचे त्यांच्या मूळ प्रभागच्या मतदार यादीतच नाव यायला हवे

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेदरम्यान मलाबार हिल मतदारसंघात निदर्शनास आलेल्या गंभीर अनियमिततांबाबत महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मालबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज विल्सन महाविद्यालय येथे मुख्य निवडणूक अधिकारी, मलाबार हिल श्री. बाळासाहेब वाघचौरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी मंत्री लोढा यांनी बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील नागरिकांच्या मतदार यादी नोंदणीसाठी बैठका घेत असल्याच्या तक्रारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्या. अशा बैठकींमधून मतदार नोंदणी प्रक्रियेवर चुकीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात येत असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

मंत्री लोढा म्हणाले "काही लोक डबल रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध राज्यात त्यांचे मतदार म्हणून नाव आहे. पश्चिम बंगाल मध्ये हा कट उघडकीस आला म्हणून तिथून ९७ लाख वोटर्स कमी झाले. पण इथे असे डबल रजिस्ट्रेशन चालणार नाही त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी बीएलओ किंवा तसं अधिकाऱ्यांच्या मदतीने मशिदींमध्ये बैठकी घेतल्या जात आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. येथे असा प्रकार बंद झाला असला तरी इतर ठिकाणी सुरु असल्याची माहिती आमच्याकडे आहे"

मलाबार हिलमधील नागरिकांच्या SIR प्रक्रियेसंदर्भातील मागण्या

SIR प्रक्रियेसंदर्भात मलाबार हिलमधील नागरिकांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र वास्तव्यास असलेल्या नागरिकांची मतदार नोंदणी SIR प्रक्रियेदरम्यान त्यांच्या तात्पुरत्या पत्त्यावर न करता कायमस्वरूपी पत्त्यावरच ठेवण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. कारण तात्पुरता पत्ता हा केवळ काही काळासाठीचा निवास असून संबंधित नागरिक भविष्यात पुन्हा त्यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानी परतणार आहेत. त्यामुळे तात्पुरत्या पत्त्यावर मतदार नोंदणी केल्यास भविष्यात पुन्हा पत्ता बदलण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया करावी लागणार आहे. या व इतर मागण्यांसंदर्भात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरिकांच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले की, "मतदार पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्याची आमची मागणी आहे. कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. धोकादायक इमारती, पुनर्विकास प्रकल्प, SRA प्रकल्प या मुळे अनेक नागरीक मूळ निवास्थानापासून दूर राहत आहेत. त्यांची नोंदणी झालेली नाही किंवा इतर ठिकाणी झालेली आहे. हा प्रश्न फक्त मुंबईमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे. अशा नागरिकांना त्यांच्या तात्पुरत्या पत्त्यावर सूचना पाठविणे, विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करणे अथवा स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देणे यासारख्या उपाययोजना तातडीने व्हायला हव्यात. तसेच मतदार पडताळणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ/बीएलए यांना अधिकृत मान्यता किंवा तत्सम पत्र मिळाले नसल्याने कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यांना लवकरात लवकर आवश्यक ती कागदपत्रे मिळावीत"

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >