FIFA World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्डकपमधील आठ देशांच्या संघात ५० टक्क्यांहून अधिक खेळाडू परदेशात जन्मलेले
June 23, 2026 07:21 PM
Fifa World Cup 2026
नवी दिल्ली : क्रिकेट किंवा फुटबॉल विश्वचषक तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण 'स्थलांतरितांचा विश्वचषक' अशी संकल्पना कधी ऐकली आहे का ? फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026 ) कडे पाहिल्यास असेच काहीसे चित्र समोर येते. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक चौथा खेळाडू असा आहे, ज्याचा जन्म त्या देशात झालेला नाही, ज्याचे प्रतिनिधित्व तो करत आहे. या विश्वचषकातील किमान आठ देशांच्या संघात ५० टक्क्यांहून अधिक खेळाडू परदेशात जन्मलेले आहेत. काही देशांच्या संघात मात्र १०० टक्के खेळाडू हे त्याच देशात जन्मलेले आहेत. यामध्ये ब्राझील, स्वीडन, कोलंबिया यांसारख्या दिग्गज देशांसोबत पनामा, ऑस्ट्रिया, चेकिया, सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
परदेशी खेळाडूंचा भरणा असलेले संघ :
कुराकाओ: या संघात केवळ एक खेळाडू कुराकाओमध्ये जन्मलेला आहे. हा देश नेदरलँड्सच्या अधिपत्याखाली असल्याने, संघातील तब्बल २५ खेळाडूंचा जन्म नेदरलँड्समध्ये झाला आहे.
डीआर कांगो: या संघातील २६ पैकी २० खेळाडूंचा जन्म विदेशात झाला आहे. यामध्ये ७ खेळाडू फ्रान्समध्ये, तर ४ खेळाडू बेल्जियममध्ये जन्मले आहेत.
मोरोक्को: १९ पैकी ६ खेळाडूंचा जन्म स्पेनमध्ये, ६ जणांचा फ्रान्समध्ये, तर ३ जणांचा जन्म नेदरलँड्समध्ये झाला आहे. विशेष म्हणजे, मोरोक्कोचा कर्णधार अशरफ हकीमी याचा जन्मही स्पेनमध्येच झाला आहे.
इतर संघ: बोस्निया-हर्जेगोविनाचे १७ पैकी ४ खेळाडू जर्मनीमध्ये, तर ३ स्वीडनमध्ये जन्मले आहेत. तसेच, अल्जीरिया आणि हैती संघात प्रत्येकी १६-१६ खेळाडू परदेशात जन्मलेले आहेत.
फ्रान्सच्या टीममध्ये आफ्रिकन मूळच्या खेळाडूंचा प्रभाव
सर्वात जास्त परदेशी खेळाडूंची चर्चा होते तेव्हा फ्रान्सचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. फ्रान्सच्या विद्यमान संघात जरी फक्त चारच खेळाडू परदेशात जन्मलेले असले, तरी संघात आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. यात काइलियन एमबापे (कॅमेरून), एनगोलो काँटे (माली), ओरेलियन चुआमेनी (कॅमेरून) यांसारख्या अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. फ्रान्सच्या बाबतीत एक विशेष बाब म्हणजे, यंदाच्या विश्वचषकात विविध देशांकडून खेळणाऱ्या ९८ खेळाडूंचा जन्म फ्रान्समध्ये झाला आहे. अल्जीरिया, गिनी, सेनेगल आणि तुर्की यांसारख्या देशांतून आलेले हजारो स्थलांतरित आता फ्रान्सच्या मातीत वाढून, आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावत आहेत.