Saturday, June 20, 2026

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

महापौराने दिले कारवाईचे सक्त आदेश

मुंबई ; लोकमान्य टिळक टर्मिनस (एल टी टी ) जवळील स्वराज चौकात शनिवारी २० जून २०२६ रोजी स्थानिक नगरसेवक सुषम सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवत अवैध गॅस सिलेंडर आणि गुटखा साठा पकडून दिला. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पोलीस, रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासन यांना निर्देश देत याप्रकरणी कोणतीही हलगर्जी न करता, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर सक्त आणि अजामीनपात्र कारवाई करावी. टर्मिनस परिसरात गस्त वाढवून , अनधिकृत फेरीवाले आणि अवैध व्यावसायिक यांच्यावर नियमित कारवाई करावी, रस्ते स्वच्छ करावेत, इत्यादी सूचना केल्या आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज चौक परिसरात मागील काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. लोकमान्य टिळक टर्मिनस परिसराचा वापर करून अवैध मालाची वाहतूक आणि साठवणूक केली जात असल्याचा संशय स्थानिक नगरसेवक सुषम सावंत यांना आला.त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह परिसरात पाळत ठेवून धाड टाकली. या कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या टेम्पो आणि इतर वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि बंदी असलेला गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.

नगरसेवक सुषम सावंत यांनी या या कारवाईची माहिती महापौर रितू तावडे यांना दिली. त्यानंतर महापौरांनी तत्काळ स्वराज चौकात भेट दिली. जप्त केलेला सिलेंडर आणि गुटखा साठा आणि एकूण परिस्थितीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा अवैध बाबींवर महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, संबंधित पोलिस, रेल्वे आणि महानगरपालिका अधिकारी यांचा पाचारण केले.

कारवाईची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर महापौर रितू तावडे म्हणाल्या की, अशा प्रकारचा अवैध सिलेंडर साठा म्हणजे परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे. तसेच बंदी असतानाही गुटख्याची विक्री होणे पूर्णतः चुकीचे आहे. गुटख्याचे व्यसन तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. नगरसेवक सुषम सावंत, माजी नगरसेवक राजेश फुलवारिया आणि इतर कार्यकत्यांनी दाखवलेली सतर्कता, जागरूकता कौतुकास्पद आहे. आता पोलीस, रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासन यांनी यात कोणतीही हलगर्जी न करता, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर सक्त आणि अजामीनपात्र कारवाई करावी. लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात गस्त वाढवावी, तसेच अनधिकृत फेरीवाले आणि अवैध व्यावसायिक यांच्यावर नियमित कारवाई करावी, रस्ते स्वच्छ करावेत, इत्यादी सूचना महापौरांनी केल्या.

दरम्यान, महापौर तावडे यांनी घटनास्थळावरून पोलिस उपायुक्त समीर शेख यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला आणि या प्रकरणात कारवाई करण्याविषयी सक्त सूचना केल्या. यावेळी, महानगरपालिकेचे एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शंकर भोसले यांच्यासह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. महापौरांच्या निर्देशानंतर पोलीस, रेल्वे आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा