Sunday, June 14, 2026

Archery World Cup 2026 : धीरज बोम्मदेवरा-कुमकुमची सोनेरी कामगिरी ! ऑलिम्पिक विजेत्यांना नमवत जिंकले गोल्ड !

Archery World Cup 2026 : धीरज बोम्मदेवरा-कुमकुमची सोनेरी कामगिरी ! ऑलिम्पिक विजेत्यांना नमवत जिंकले गोल्ड !

मुंबई : तिरंदाजी विश्वचषक २०२६ मधून भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा धीरज बोम्मदेवरा आणि कुमकुम मोहोड या जोडीने तिरंदाजी विश्वचषक २०२६ च्या तिसऱ्या फेरीत ऑलिम्पिक विजेत्यांना हरवत सुवर्णपदक पटकावले आहे. तुर्कीतील अंताल्या येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विद्यमान ऑलिम्पिक विजेता दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव करत जेतेपदक पटकावले आहे.

ऑलिम्पिक विजेत्यांवर भारतीय तिरंदाजांचा दबदबा

अंतिम सामन्यात भारतासमोर दक्षिण कोरियाची बलाढ्य जोडी ओह ये-जिन आणि किम जे-डिओक यांचे आव्हान होते. मात्र धीरज आणि कुमकुम यांनी सुरुवातीपासूनच अचूक लक्ष्यभेद करत सामन्यावर नियंत्रण ठेवले. भारताने पहिल्या दोन सेटमध्ये अनुक्रमे 37-36 आणि 37-36 अशी एक-एक गुणांच्या फरकाने बाजी मारली. त्यामुळे भारताने 4-0 अशी आघाडी घेतली. तिसरा सेट 39-39 असा बरोबरीत सुटल्याने कोरियाला एक गुण मिळाला, मात्र भारताने 5-1 ने सामना जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. निर्णायक क्षणी धीरज बोम्मदेवराने जबरदस्त अचूकता दाखवत शेवटचे दोन बाण थेट परफेक्ट 10 मध्ये मारले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताचा विजय निश्चित झाला. ऑलिम्पियन धीरजसाठी (24) आणि कुमकुम मोहोडसाठी (17) हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिलेच वर्ल्ड कप मिश्र सांघिक सुवर्णपदक ठरले.

चार वर्षानंतर भारताची प्रतीक्षा संपली

याआधी भारताने 2022 मध्येही अंताल्या येथेच रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात वर्ल्ड कप सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी ऋद्धी फोर आणि तरुणदीप राय यांनी ग्रेट ब्रिटनचा शूट-ऑफमध्ये पराभव करत भारताला जेतेपद मिळवून दिले होते. आता धीरज आणि कुमकुम यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी भारतीय तिरंदाजी संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >