Tuesday, June 9, 2026

Gujrat Congress News : काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का; राज्यसभेत एकही खासदार राहणार नाही!

Gujrat Congress News : काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का; राज्यसभेत एकही खासदार राहणार नाही!

गुजरात : गुजरातमधील (Gujrat) चार राज्यसभा जागांसाठी भाजपच्या (BJP) उमेदवारांनी अर्ज भरले असून विरोधकांकडून एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे भाजपचे चारही उमेदवार बिनविरोध (Unopposed) विजयी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. औपचारिक घोषणा बाकी असली तरी हा क्षण भाजपसाठी ऐतिहासिक मानला जात आहे.

गुजरात राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच राज्यसभेत काँग्रेसचा एकही खासदार (MP) नसणार आहे. यामुळे गुजरात आता पूर्णपणे काँग्रेसमुक्त झाल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसने या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत हा भाजपचा राजकीय अहंकार (Political Arrogance) असल्याचे म्हटले आहे.

सध्या गुजरातमधून काँग्रेसचे एकमेव राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेतील काँग्रेसचे अस्तित्वही संपुष्टात येणार आहे. गुजरात विधानसभेत एकूण १८२ आमदार असून काँग्रेसकडे केवळ १२ आमदार आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) देखील गमावले होते. राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का (Political Setback) मानला जात आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा दिली होती. काँग्रेस पक्ष संपवण्याचा नव्हे, तर भ्रष्टाचार (Corruption), घराणेशाही (Dynasty Politics) आणि मतपेटीचे राजकारण (Vote Bank Politics) यांसारख्या काँग्रेस संस्कृतीचा अंत करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मभूमीत काँग्रेसची ताकद गेल्या काही वर्षांत सातत्याने कमी होत गेली आहे. त्याचा परिणाम आता राज्यसभेतील प्रतिनिधित्वावरही दिसून आला आहे.

गुजरातमधून राज्यसभेवर एकूण ११ सदस्य निवडून जातात. नव्या समीकरणांनंतर पहिल्यांदाच या सर्वच्या सर्व ११ जागांवर भाजपचे सदस्य असतील. स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसचा आकडा शून्यावर पोहोचल्याने गुजरातच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. लोकसभेच्या २६ जागांपैकी २५ जागांवर भाजपचे खासदार आहेत, तर काँग्रेसकडे केवळ एक जागा आहे. गेनीबेन ठाकोर या गुजरातमधील काँग्रेसच्या एकमेव लोकसभा खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या होम टर्फ (Home Turf) मानल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >