Thursday, June 4, 2026

Legislative Council Elections 2026 : विधानपरिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध

Legislative Council Elections 2026 : विधानपरिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध

मविआची निवडणुकीआधीच माघार; बंडखोरी थोपवण्यात महायुतीला यश; कोकणात नितेश राणे यांच्या शिष्टाईमुळे 'उबाठा' चितपट

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात गुरुवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. संख्याबळाचे गणित अनुकूल नसल्याने महाविकास आघाडीच्या (मविआ) अधिकृत उमेदवारांसह अनेक बंडखोरांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे मतदान होण्यापूर्वीच १७ पैकी तब्बल ६ जागा बिनविरोध करण्यात महायुतीला यश आले आहे. यामध्ये ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या जागांचा समावेश आहे. विशेषतः कोकणात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शेवटच्या दोन तासांत चक्रे फिरवून मविआचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांची माघार घडवून आणल्याने 'उबाठा' गटाला जोरदार धक्का बसला आहे.

या निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या रणधुमाळीकडे लागले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत असलेल्या अर्ज माघारीच्या मुदतीत महायुतीने आपल्या गोटातील बंडखोरी थोपवण्यात मोठे यश मिळवले, तर दुसऱ्या बाजूला मविआच्या गोटात मात्र पूर्णपणे निराशा पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. येथे मविआचे उमेदवार म्हणून उबाठा गटाचे सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी अर्ज भरल्यामुळे रंजक लढत होईल असे वाटत होते. मात्र, अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यास अवघे दोन तास शिल्लक असताना मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांच्याशी संपर्क साधला. नितेश राणे स्वतः बाळ माने यांना सोबत घेऊन रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि तिथे माने यांनी आपला अर्ज मागे घेतला. मविआतील घटक पक्षांनी आपल्याला शेवटपर्यंत साथ दिली नाही आणि निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याची कबुली बाळ माने यांनी दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.

पुण्यात शरद पवार गटाची माघार

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या आदेशानुसार आपण माघार घेत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीचे (अजित पवार गट) उमेदवार आणि माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. यवतमाळ, वर्धा, ठाणे आणि अहिल्यानगरमध्ये महायुतीचा झेंडा

यवतमाळच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेची जागा बिनविरोध झाली आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आधीच माघार घेतली होती, तर गुरुवारी शेवटच्या क्षणी भाजपचे बंडखोर नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीचे साजिद बेग यांनीही अर्ज मागे घेतल्याने शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले आहेत. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपचे अरुण लखाणी यांचा विजय सुकर झाला. ठाणे मतदारसंघात मविआचे अभिजीत पवार यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक, तर अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे बंडखोर करण ससाणे आणि कमलेश गांधी यांनी माघार घेतल्यामुळे भाजप महायुतीचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले आहेत.

कुठे काय स्थिती?

- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान महायुतीने राज्यभरात आपल्या बंडखोरांना थोपवण्यात यश मिळवले. धाराशिव-लातूर-बीडमध्ये भाजप बंडखोर अर्चना गंगणे यांनी अर्ज मागे घेतल्याने आता भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख अशी थेट लढत होईल.- नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतल्याने भाजपचे अमरनाथ राजूरकर यांचा मार्ग सुकर झाला आहे.

- परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या संग्राम व विजय जामकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतर अर्ज मागे घेतले. सांगली-सातारा मतदारसंघात मंत्री शंभूराजे देसाई यांच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या तानाजीराव पाटलांनी बंडखोरी मागे घेतली.

- नागपूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डमी उमेदवाराने माघार घेतल्याने आता काँग्रेसचे अतुल लोंढे आणि भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

- दरम्यान, अमरावतीत मोठी राजकीय घडामोड घडली असून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून सर्व पदांचा राजीनामा दिला असून ते बच्चू कडू यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नाशिकमध्ये बंडखोरी कायम

या संपूर्ण प्रक्रियेत महायुतीने जवळपास सर्वच जागांवरील अंतर्गत वाद मिटवले असले तरी नाशिकमधील बंडखोरी पूर्णपणे निवळलेली नाही. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांसह भाजपचे गणेश गीते यांनी अर्ज मागे घेतला असला, तरी त्यांचे बंधू गोकूळ गीते यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्यासमोर गोकूळ गीते यांचे आव्हान असणार आहे. त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देण्याचे नियोजन केले आहे. ११ जागांवर होणार लढती

१. नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकूळ गीते (अपक्ष)

२. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (उबाठा)

३. सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध बाळासाहेब पाटील (अपक्ष), अभयसिंह जगताप (शरद पवार गट)

४. नांदेड : अमरनाथ राजूरकर (भाजप महायुती) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)

५. भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर (भाजप) विरुद्ध दिलीप बनसोड (काँग्रेस)

६. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप महायुती) विरुद्ध वसंतराव देशमुख (शरद पवार गट)

७. अमरावती : प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध हर्षदीप देशमुख (काँग्रेस)

८. धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

९. परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (उबाठा)

१०. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाठ (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (अपक्ष)

११. नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >