Tuesday, June 2, 2026

Crime News : फक्राबाद येथे दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी, १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास

Crime News : फक्राबाद येथे दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी, १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास

Crime News : जामखेड (Jamkhed) तालुक्यातील फक्राबाद (Fakhrabad) येथे सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने आढाववस्ती येथे दरोडा टाकत कोयत्याने केलेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तसेच घरातील १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. या घटनेत मारहाण झालेल्या तीन जणांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. फक्राबाद (Fakhrabad) येथिल दरोड्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं ?

दरोडेखोरांच्या मारहाणीत फिर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढावा वय ४८, अंगद अण्णासाहेब आढाव, मैनाबाई मधुकर पारे व वृध्द महीला सुभद्रा आण्णासाहेब आढाव असे एकुण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढाव या आपल्या कुटुंबा समवेत फक्राबाद येथील आढाववस्ती या ठिकाणी घरासमोरील आंगणामध्ये झोपले होते.

३१ मे २०२६ रोजी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने फिर्यादी यांच्या अंगणामध्ये झोपलेल्या चार जणांवर कोयता गज व काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत चारजण गंभीर जखमी झाले. या जखमींवर तातडीने फक्राबाद येथिल हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करुन कौशल्या आढावा, अंगद अण्णासाहेब आढाव, मैनाबाई पारे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. तर वृध्द महीला सुभद्रा आण्णासाहेब आढाव यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दरोडेखोरांच्या टोळीने घरामध्ये प्रवेश करुन घरातील रोख रक्कम ४० हजार रुपये, १० हजार रुपयांचा एक मोबाईल व १ लाख ४० हजार रुपयांचे साडेतीन तोळे सोने असा एकुण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला. यानंतर आरडाओरडा झाल्यावर आजुबाजुच्या वस्तीवरील लोक घटनास्थळी धावत आले मात्र तो पर्यंत दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या प्रकरणी कौशल्य आण्णासाहेब आढावा यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करित आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >