Tuesday, June 2, 2026

Cabinet Minister Mangalprabhat Lodhan : गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत वीजपुरवठा समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला जाईल

Cabinet Minister Mangalprabhat Lodhan : गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत वीजपुरवठा समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला जाईल

वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरसेविका सौ स्नेहल तेंडुलकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा

मुंबई : गिरगाव परिसरात अलीकडे वारंवार होत असलेल्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा यांनी नगरसेविका सौ स्नेहल तेंडुलकर व BEST च्या अधिकाऱ्यांसह प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे स्पष्ट निर्देश दिले. कामात होणारा विलंब, समन्वयाचा अभाव आणि निष्काळजीपणा याबाबत संबंधितांना कठोर शब्दांत जाब विचारत नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, काम अर्धवट सोडून निघून गेल्यास स्वतः धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रभाग २१८ मधील नगरसेविका सौ. स्नेहल तेंडुलकर यांनी देखील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची भूमिका मांडली.

मरीन लाइन्स पुलाजवळील BEST स्टेशन परिसरात ३३,००० वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून, ही लाईन रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्ती प्रक्रियेस काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पर्यायी व्यवस्था म्हणून सध्या विविध ठिकाणांहून ११,००० वोल्ट वीज पुरवठा वळविण्यात आला आहे.मा. लोढा यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी गिरगाव गायवाडी येथे BEST ची विशेष बस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिकांना त्यांच्या समस्या नोंदविणे आणि त्यावर त्वरित कार्यवाही होणे सुलभ होईल. तसेच, दुरुस्तीच्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सौ स्नेहल तेंडुलकर यांनी नमूद केले.याशिवाय, येत्या काही महिन्यांत संपूर्ण गिरगाव परिसरात वीजेच्या वाढत्या मागणीचा आढावा घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षण करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त सबस्टेशन्स उभारण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, सध्याचे वीज खंडन हे पूर्वनियोजित नसून वाढीव भारामुळे प्रासंगिक स्वरूपाचे असल्याचे BEST प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीदेखील, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना वेळेवर माहिती उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

सध्या फाटकवाडी येथून फॉल्ट दुरुस्तीच्या गाड्या कार्यरत असून, त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे त्या सर्व ठिकाणी वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन, पुढील साधारण एक आठवड्यात D व C विभागासाठी दुरुस्तीच्या गाड्या ताडदेव BEST विभागातून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच, संबंधित संपर्क क्रमांकही लवकरच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील. गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास मा. लोढा व सौ तेंडुलकर यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >