Sunday, May 31, 2026

IPL 2026 Final : आज अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला; आरसीबी की गुजरात? दुसऱ्या जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज...

IPL 2026 Final : आज अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला; आरसीबी की गुजरात? दुसऱ्या जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज...

RCB VS GT : आयपीएल (IPL) 2026 च्या अंतिम लढतआज गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना आयपीएल इतिहासातील दुसरे जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. मागील हंगामात पहिले विजेतेपद जिंकणाऱ्या आरसीबीला सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याची संधी आता आली आहे. तर 2022 मध्ये पदार्पणातच चॅम्पियन ठरलेल्या गुजरात टायटन्सला पुन्हा एकदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.

हेड टू हेड

आरसीबी आणि गुजरात यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत ९ सामने झाले आहेत. त्यापैकी 5 सामने बंगळुरूने तर 4 सामने गुजरातने जिंकले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी आकडेवारीत आरसीबी एका विजयाने आघाडीवर आहे.

क्वालिफायर-1 मधील पराभवाचा बदला घेणार गुजरात?

दोन्ही संघांची शेवटची भेट क्वालिफायर-1 मध्ये झाली होती. त्या सामन्यात आरसीबीने गुजरातचा तब्बल 92 धावांनी पराभव करत थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात गुजरातकडे त्या पराभवाचा बदला घेण्याची आणि दुसरा जेतपदक झळकाव्याची संधी असणार आहे.

किंग विरुद्ध प्रिन्स

आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने यंदाच्या हंगामात 15 सामन्यांत 600 धावा केल्या असून त्याच्या बॅटमधून एक शतक आणि चार अर्धशतके झळकली आहेत. दुसरीकडे गुजरातचा कर्णधार शुभमन गिल अफलातून फॉर्ममध्ये आहे. त्याने 15 सामन्यांत 722 धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. क्वालिफायर-2 मध्ये राजस्थानविरुद्ध त्याने 104 धावांची शतकी खेळी करत संघाला फायनलमध्ये पोहोचवले.

गुजरातची फलंदाजी ठरणार मोठे शस्त्र

शुभमन गिलसोबत साई सुदर्शनही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सुदर्शनने यंदा 710 धावा करत गुजरातच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. या दोघांची सलामीची जोडी आरसीबीच्या गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरु शकते.

पर्पल कॅपसाठी रबाडा-भुवनेश्वर यांच्यात लढत

गुजरातचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक 28 विकेट्स घेतल्या आहेत. तर आरसीबीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार 26 विकेट्ससह पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे.

पिच रिपोर्ट : मोठ्या धावसंख्येची अपेक्षा

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. मात्र यंदाच्या हंगामात येथे केवळ तीन वेळाच 200 धावांचा टप्पा पार झाला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजांनाही मदत मिळू शकते. नॉकआऊट सामन्याचा दबाव लक्षात घेता संघांनी सावध सुरुवात करण्याची शक्यता जास्त मानली जात आहे.

इतिहास काय सांगतो?

विशेष म्हणजे गेल्या आठ आयपीएल हंगामांमध्ये क्वालिफायर-1 जिंकणाऱ्या संघानेच अंतिम सामना जिंकला आहे. यावेळी RCB ने क्वालिफायर-1 जिंकला असल्याने आकडेवारी त्यांच्याच बाजूने दिसत आहे. मात्र फायनलमध्ये दबावाला कोणता संघ अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जातो, यावरच विजेतेपदाचे भवितव्य ठरणार आहे. आज विराट कोहलीच्या अनुभवाची आणि शुभमन गिलच्या युवा जोशाची लढत पाहायला मिळणार आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य प्लेईंग 11: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेविड, कुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, जैकब डफी, रोमारियो शेफर्ड

इम्पॅक्ट प्लेयर : रसिख सलाम डार/ सुयश शर्मा

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11: साई सुदर्शन, शुभमन गिल (कप्तान), जोस बटलर (विकेट कीपर), निशांत सिंधु, वाशिंगटन सुंदर, जेसन होल्डर, राशिद खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज और प्रसिद्ध कृष्णा

इम्पॅक्ट प्लेयर : आर.साई किशोर

Comments
Add Comment