Tuesday, May 26, 2026

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेणार

मुंबई : विधानपरिषदेच्या १६ जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी जाहीर झालेल्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम निर्णय प्रलंबित असतानाच, भाजपने आपल्या कोट्यातील संभावित १२ जागांसाठी तब्बल ४८ इच्छुकांच्या नावांची यादी तयार केली आहे. ही यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्ली दौऱ्यात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा करणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १ जूनपर्यंतची मुदत शिल्लक असल्याने पुढील २ ते ३ दिवसांत भाजपच्या १२ उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. चव्हाणांच्या या दौऱ्यात महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर तपशीलही केंद्रीय नेतृत्वासमोर मांडला जाणार आहे. महायुतीमध्ये भाजपने स्वतःकडे १२ जागा ठेवून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) १ जागा देण्याचा फॉर्म्युला मांडला आहे. मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव थेट फेटाळून लावला असून आपण किमान ७ जागा लढवणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक, कोकण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि हिंगोली या मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. भाजप केवळ ४ जागांवरच अडकून राहिल्याने शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 'स्वबळा'वर लढण्याचा आग्रह नेतृत्वाकडे धरला आहे. तथापि, महायुतीला तडे जाऊ नयेत म्हणून सर्वोच्च पातळीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पत्रकारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले

जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या समोर आलेल्या एकनाथ शिंदे यांना जेव्हा जागावाटपाबाबत प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. "कुठलं बोलणार... काय आहे?" असा उलट सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या या बदललेल्या आक्रमक देहबोलीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >