Saturday, May 23, 2026

ICC New Rules : ड्रिंक्स ब्रेकमध्ये मैदानात उतरणार प्रशिक्षक? दोन रंगांच्या चेंडूंचाही वापर; क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची शक्यता

ICC New Rules : ड्रिंक्स ब्रेकमध्ये मैदानात उतरणार प्रशिक्षक? दोन रंगांच्या चेंडूंचाही वापर; क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची शक्यता

ICC : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. आयसीसी सध्या नव्या नियमांवर विचार करत आहे. त्यामध्ये मुख्य प्रशिक्षकाला थेट मैदानात प्रवेश, एकाच कसोटीत दोन रंगांच्या चेंडूंचा वापर आणि टी-20 सामन्यांच्या ब्रेकच्या वेळेत कपात अशा महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे.यातील सर्वात चर्चेत असलेला प्रस्ताव म्हणजे ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मुख्य प्रशिक्षकाला मैदानात जाऊन खेळाडूंना रणनीती सांगण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. त्यामुळे सामन्यादरम्यान प्रशिक्षकांचा थेट सहभाग वाढणार असून संघांच्या रणनितीतही मोठा बदल दिसू शकतो. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासारखे प्रशिक्षक आता ड्रिंक्स ब्रेकमध्ये थेट खेळाडूंशी चर्चा करताना दिसू शकतात. सध्या वनडे क्रिकेटमध्ये प्रत्येक डावात दोन ड्रिंक्स ब्रेक असतात. नियमानुसार या दोन्ही ब्रेकमध्ये मुख्य प्रशिक्षकाला मैदानात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र प्रशिक्षकासाठी ड्रेस कोड किंवा इतर अटी काय असतील, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आहे.

कसोटीत लाल आणि गुलाबी चेंडूचा एकत्र वापर होणार ?

आयसीसी आणखी एका मोठ्या बदलावर विचार करत आहे. हवामान किंवा कमी प्रकाशामुळे खेळात अडचणी येतात. यावर उपाय म्हणून कसोटी सामन्यात लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजेच एकाच कसोटी सामन्यात रेड बॉल आणि पिंक बॉल दोन्ही वापरले जाऊ शकतात. यामुळे गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. भारतासारख्या देशांमध्ये संध्याकाळी प्रकाश कमी होत असल्याने अनेकदा खेळ लवकर थांबवावा लागतो. त्यामुळे षटकांचं नुकसान होतं आणि सामन्याच्या निकालावरही परिणाम होतो. यावर उपाय म्हणून हा उपाय विचाराधीन आहे.

टी-20 सामन्यांमध्येही मोठा बदल शक्य

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डावांमधील विश्रांतीची वेळ २० मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी करण्याचाही प्रस्ताव चर्चेत आहे. त्यामुळे सामने अधिक जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या सर्व नियमांवर चर्चा झाली आहे. आता ३० मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या ICC बोर्डाच्या बैठकीत या बदलांवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा