Saturday, May 23, 2026

दादर ते सिद्धिविनायक थेट 'बेस्ट' बससेवा

दादर ते सिद्धिविनायक थेट 'बेस्ट' बससेवा

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीचा आणि खिशाला परवडणारा होणार आहे. दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान थेट सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नवीन बसमार्ग क्र. 'ए-८१४' (सिद्धिविनायक फेरी) चा भव्य लोकार्पण सोहळा शनिवारी (२३ मे) पार पडला. या नव्या बससेवेमुळे दादर स्थानकावर उतरून मंदिराकडे जाणाऱ्या मुंबईसह परराज्यातील भाविकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत या मार्गावर थेट बससेवा नसल्याने भाविकांना महागड्या टॅक्सी प्रवासावर अवलंबून राहावे लागत होते.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर यांनी २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या विशेष पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला बेस्ट समितीच्या माजी अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, विश्वस्त मीनाताई कांबळे यांच्यासह बेस्टचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाविकांना फायदा उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, दादर हे मुंबईचे मुख्य रेल्वे केंद्र असल्याने हजारो भाविक याच स्थानकावरून सिद्धिविनायकाकडे जातात. मंगळवार, अंगारकी चतुर्थी आणि शनिवार-रविवार सुट्ट्यांच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, ही थेट 'फेरी बससेवा' भाविकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणारी ठरेल. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या गरजेची दखल घेत अवघ्या काही महिन्यांत हा मार्ग प्रत्यक्ष सुरू केल्याबद्दल मंदिर न्यास आणि भाविकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment