मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य करार


मुंबई : भारत आणि सायप्रस यांच्यातील आर्थिक व सामरिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ स्थापन करण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी गुरुवारी येथे केली. हे केंद्र येत्या १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असून, भारतीय कंपन्यांना युरोपियन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ते एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दक्षिण मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेस येथे आयोजित ‘सायप्रस–भारत बिझनेस फोरम’मध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासन हे स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याची ग्वाही देत सायप्रसच्या उद्योगसमूहांना राज्यात गुंतवणुकीचे आवाहन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या सायप्रस दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांना “स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप”चे स्वरूप प्राप्त झाले असून आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी नमूद केले. मुंबईत सुरू होणारे ट्रेड सेंटर भारतीय उद्योगांना सायप्रससह युरोपमधील व्यापार संधींबाबत मार्गदर्शन करेल. सायप्रस हे युरोपियन युनियन आणि युरोझोनचे सदस्य राष्ट्र असल्याने ४५ कोटी ग्राहकांच्या युरोपीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय कंपन्यांना हे एक प्रभावी केंद्र ठरेल. कमी कॉर्पोरेट करदर, पारदर्शक नियमावली आणि इंग्रजी-आधारित कायदेशीर व्यवस्था यामुळे भारतीय कंपन्यांसाठी सायप्रस आकर्षक पर्याय ठरत असून, दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. "इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर" उपक्रमामुळे व्यापार, ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये नवीन संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.



सीमापार वित्तीय व्यवहारांसाठी नवे मार्ग खुले - मुख्यमंत्री


बिझनेस फोरममध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या ६६० अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेची बलस्थाने मांडली. देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे ३० टक्के आणि परकीय गुंतवणुकीत ४० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे, याकडे त्यांनी जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि वित्तीय सेवांमध्ये सायप्रसची मोठी ताकद असून, भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि फिनटेक क्षेत्रात जगात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सायप्रसच्या युरोपीय वित्तीय नेटवर्क आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या मिलाफातून सीमापार वित्तीय व्यवहारांसाठी नवे मार्ग खुले होतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे सांगत भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागर हे व्यापार व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक जवळ येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


नेमके कोणते करार झाले?
या बिझनेस फोरममध्ये दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी सहा महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.यामध्ये सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री आणि फिक्की यांच्यात उद्योग व व्यापार सहकार्याचा, तर इन्व्हेस्ट सायप्रस आणि फिक्की यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहनाचा करार झाला. तसेच सायप्रस चेंबर आणि सीआयआय यांच्यात औद्योगिक सहकार्य वाढवण्याबाबत, तर युरोबँक आणि फिक्की यांच्यात बँकिंग क्षेत्रातील सहकार्याचा करार करण्यात आला. संरक्षण क्षेत्राला बळ देण्यासाठी सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चर्स आणि सायप्रस डिफेन्स ॲण्ड स्पेस इंडस्ट्री क्लस्टर यांच्यात, तर तंत्रज्ञान क्षेत्रात 'सप्तंग लॅब प्रा.लि.' आणि 'चॅनेल आयटी लिमिटेड' यांच्यात सामंजस्य करार झाला.

Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य