नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटची भेट दिली.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरून तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी याला 'Melodi ट्रेंड' असं नाव दिलं आहे. मात्र या ट्रेंडचा सध्या पार्ले कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. (Melody Trend and Parle Shares)
शेअर बाजारात पार्ले कंपनीची हवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारले कंपनीच्या मेलोडीची भेट दिल्यानं शेअर बाजारात वेगळाच ट्रेंड पाहायला मिळाला. शेअर बाजारात पारले इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांनी पैशांचा पाऊस पाडला. नरेंद्र मोदी यांनी मेलोडी चॉकलेट भेट देताच शेअर बाजारात पारले इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. (Melody Trend and Parle Shares)
नाव एका कंपनीचं फायदा मात्र दुसऱ्या कंपनीला :
पारले कंपनीच्या शेअर्सला आज अप्पर सर्किट लागलं. मात्र, पारले इंडस्ट्रीज लिमिटेड आणि पारले प्रोडक्टस या दोन वेगळ्या कंपन्या आहेत. पारले प्रोडक्टस ही कंपनी ९७ वर्ष जुनी आहे. या कंपनीची सुरुवात मोहनलाल दयाल यांनी हाऊस ऑफ पारले नावानं केली होती. या कंपनीचे २१ प्रोडक्टस बाजारात असून १२५ हून अधिक ठिकाणी कारखाने आहेत. पारले जी बिस्कीट आणि टॉफी शिवाय चॉकलेट, केक, रस्क, स्नॅक्स, ब्रेक फास्ट सीरिअल आणि आटा विक्री करते. याशिवाय हाइड अँड सीक, क्रॅकजॅक, मोनॅको, किस्मी, मलोडी आण पारले रस्क या उत्पादनांची विक्री करते. (Melody Trend and Parle Shares)
पारले इंडस्ट्रीज आणि पारले प्रोडक्टस या कंपन्यांचा एकमेकांशी संबंध नाही. पारले प्रोडक्टस नामांकित एफएमसीजी कंपनी आहे. मात्र, पारले इंडस्ट्रीज ही वेगळी कंपनी असून ती बीएसईवर लिस्टेड आहे. ही कंपनी रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसायकलिंग व्यवसायात कार्यरत आहे. (Melody Trend and Parle Shares)
कंपनीच्या नामसाधार्म्यामुळे हा घोळ झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी पारले इंडस्ट्रीजच्या शेअरची खरेदी केली. हा पेनी शेअर आज 5.25 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचा मेलोडी चॉकलेट तयार करणाऱ्या पारले प्रॉडक्ट्स कंपनीशी कोणताही संबंध नाही. पण पारले नामसाधर्म्याचा तिला फायदा झाला. आज या शेअरला अप्पर सर्किट लागले. (Melody Trend and Parle Shares)