Tuesday, May 19, 2026

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि परिणामकारक निचरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेने सर्वंकष कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि भाजप मुंबई अध्यक्ष,आमदार अमित साटम यांनी संयुक्तपणे ही दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे या मागील पंधरवड्यापासून पावसाळापूर्व कामांचा प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन सातत्याने आढावा घेत आहेत. पूर्व व पश्चिम उपनगरे तसेच शहर विभागातील नालेसफाई आणि रस्ते विकास कामांची पाहणी केल्यानंतर, त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकाऱ्यांनी पावसाळापूर्व तयारीचा एक भाग म्हणून मुंबईतील लोकप्रतिनिधींनी रे रोडस्थित ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्र, वरळी येथील लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्र व क्लिव्हलँड पर्जन्य जल उदंचन केंद्रांची मंगळवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी (सक्रे), शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, 'बेस्ट' समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष यामिती जाधव, स्थापत्य समिती (उपनगरे) श्रीमती संगीता शर्मा, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, महिला व बाल विकास समितीच्या उपाध्यक्ष रिटा मकवाना, नगरसेवक रोहिदास लोखंडे, नगरसेवक अजय पाटील, नगरसेवक भास्कर शेट्टी आदी लोकप्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी झाले होते. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्यासह पर्जन्य जल वाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुसळधार पावसाच्या वेळी व भरतीच्या काळात साचलेले पावसाचे पाणी उदंचन संचांच्या साहाय्याने समुद्रात सोडण्याचे महत्वपूर्ण कार्य पर्जन्य जल उदंचन केंद्रांमार्फत केले जाते. ओहोटीच्या काळात पूर नियंत्रक दरवाजे खुले असतात, त्यावेळी नाल्यातील पाणी नैसर्गिकरित्या गुरुत्वाकर्षणाने थेट समुद्रात वाहून जाते. भरतीच्या काळात साचलेले पावसाचे पाणी उदंचन संचांच्या साहाय्याने समुद्रात सोडले जाते. पूर नियंत्रक दरवाजांचा उपयोग भरतीच्या काळात समुद्राचे पाणी नाल्यामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याकरिता केला जातो. नाल्यातील कचरा अडवून काढण्यासाठी या यांत्रिक जाळी प्रणालीचा वापर केला जातो. सध्या हाजी अली (महालक्ष्मी), इर्ला (जुहू), लव्हग्रोव्ह (वरळी), क्लिव्हलँड (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), गझदरबंध (सांताक्रूझ) अशी ६ उदंचन केंद्रे कार्यरत आहेत. उर्वरित २ उदंचन केंद्रे म्हणजे माहुल (चेंबूर) आणि मोगरा (वेसावे) यांची कार्यवाही प्रगतिपथावर आहे, असेही महापौर तावडे यांनी नमूद केले. प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना आमदार अमीत साटम म्हणाले की, महापालिकेचे पदाधिकारी स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे पावसाळापूर्व कामांची पाहणी, निरीक्षण करत आहेत. प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेत आहेत. आवश्यक ते निर्देश देत आहेत. समुद्रात जाणारा कचरा / तरंगता कचरा रोखला पाहिजे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment