Friday, May 15, 2026

Pune Hadapsar News : मोठी बातमी! अखेर हडपसर रुग्णालय बॉम्ब प्रकरणातील आरोपीचा चेहरा समोर; दहशतवादाचा अँगल ?

Pune Hadapsar News : मोठी बातमी! अखेर हडपसर रुग्णालय बॉम्ब प्रकरणातील आरोपीचा चेहरा समोर; दहशतवादाचा अँगल ?

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एका खासगी रुग्णालयात जिवंत बॉम्ब (IED) सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. मात्र, आता पुणे पोलिसांच्या हाती या प्रकरणाचे भक्कम धागेदोरे लागले आहेत. तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सूक्ष्म विश्लेषणातून या भयंकर कृत्यामागील मुख्य आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना घवघवीत यश आले आहे. आरोपीचे नाव आणि ओळख निष्पन्न झाली असून, त्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात असलेला तणाव आणि सस्पेन्स आता संपुष्टात आला आहे.

घातपाताची शक्यता फेटाळली

रुग्णालयासारख्या गर्दीच्या ठिकाणी स्फोटक सापडल्याने पुण्यात एखाद्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट तर नाही ना, अशी रास्त भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु, सखोल चौकशीअंती पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी किंवा देशविघातक कृत्याशी अजिबात संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या अधिकृत खुलाशाने दहशतीच्या छायेत असलेल्या पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

रुग्णालयावरील रागातून उचलले टोकाचे पाऊल

जर हा दहशतवादी कट नव्हता, तर मग हा बॉम्ब कोणी आणि का ठेवला? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा संपूर्ण प्रकार एका वैयक्तिक वादातून आणि सूडबुद्धीतून घडल्याचे दिसून येत आहे. उपचाराचा वाढलेला खर्च, बिलावरून झालेला वाद किंवा रुग्णालयातील एखाद्या डॉक्टर वा कर्मचाऱ्यासोबत झालेले भांडण, यापैकीच एखाद्या कारणामुळे चिडून आरोपीने केवळ रुग्णालयाला धडा शिकवण्यासाठी आणि घबराट निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि १५ ते १८ संशयितांची कसून चौकशी केली. या अथक प्रयत्नांनंतरच आरोपीचा खरा चेहरा समोर आला आहे. आरोपीची ओळख पटली असून अखेर त्याला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं हे धक्कादायक कृत्य का केलं?  हे लवकरच चौकशीतून समोर येणार आहे.

नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी?

बुधवारी सायंकाळच्या सुमारास हडपसर येथील 'उषाकिरण सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल'च्या पुरुषांच्या स्वच्छतागृहात एक संशयास्पद वस्तू आढळली होती, जी नंतर जिवंत बॉम्ब (IED) असल्याचे स्पष्ट झाले. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने (BDDS) अत्यंत शिताफीने तो निकामी करून मोठा अनर्थ टाळला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्याचे दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांसारख्या सर्वोच्च तपास यंत्रणांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. सुरुवातीला दहशतवादी कारवाई वाटणारे हे प्रकरण आता निव्वळ एका वैयक्तिक वादातून आणि बदल्याच्या भावनेतून घडलेले कृत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >