Friday, May 15, 2026

Mumbai To Alibaug Ferry : अलिबागचा प्लॅन करताय? जरा थांबा! मुंबई-मांडवा बोट सेवा 'या' तारखेपासून होणार बंद

Mumbai To Alibaug Ferry : अलिबागचा प्लॅन करताय? जरा थांबा! मुंबई-मांडवा बोट सेवा 'या' तारखेपासून होणार बंद

मुंबई : मुंबईकरांचे सर्वात जवळचे आणि आवडते वीकेंड डेस्टिनेशन असणाऱ्या अलिबागला भेट देण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी प्रवासी बोट सेवा येत्या २६ मे पासून थांबवण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रात निर्माण होणारे वादळी वारे, उंच लाटा आणि धोके लक्षात घेऊन, ३१ ऑगस्टपर्यंत ही जलवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सागरी मंडळाचा खबरदारीचा उपाय

महाराष्ट्र सागरी मंडळाने (Maharashtra Maritime Board) दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हा सुरक्षिततेचा उपाय योजला आहे. पावसाळ्यात समुद्राचे रौद्र रूप आणि संभाव्य चक्रीवादळांचा धोका टाळण्यासाठी २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत गेटवे ते मांडवा जलप्रवास बंद राहील. या निर्णयामुळे आता अलिबागला जाणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना रस्तेमार्गाचा अवलंब करावा लागेल किंवा जास्त पैसे मोजून रो-रो (Ro-Ro) फेरीचा आधार घ्यावा लागेल.

रस्ते प्रवासाचा वाढलेला वेळ आणि ट्रॅफिकचा फटका

या बंदीमुळे पीएनपी (PNP), मालदार (Maldar) आणि अजंठा (Ajanta) यांसारख्या प्रमुख बोट सेवा आता थेट पावसाळ्यानंतर, म्हणजेच सप्टेंबर महिन्यातच प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. जे पर्यटक रस्तेमार्गे जाण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी 'अटल सेतू'चा नवीन आणि जलद पर्याय नक्कीच उपलब्ध आहे. मात्र, पेण-वडखळ आणि कार्लेखिंड या टप्प्यांवर नेहमीच असणारी मोठी वाहतूक कोंडी प्रवासाचा बराचसा वेळ वाया घालवू शकते. परिणामी, एरवी बोटीने अवघ्या दीड तासात पूर्ण होणारा मुंबई ते अलिबाग प्रवास आता रेंगाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा बेत आखताना प्रवासासाठी लागणारा जास्तीचा वेळ आणि ट्रॅफिक लक्षात घेणे गरजेचे ठरणार आहे.

सर्वसामान्यांची गैरसोय आणि महागडे पर्याय

सागरी मंडळाच्या सूचनेनुसार सर्व प्रवासी बोटी आता किनाऱ्यावरच नांगरून ठेवल्या जातील. केवळ गेटवे-मांडवाच नव्हे, तर 'भाऊचा धक्का ते रेवस' ही अत्यंत वर्दळीची जलवाहतूकही बंद राहणार असल्याने रोज प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या 'रो-रो' सेवेचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या बजेटबाहेरचे आहेत. दुसरीकडे, रस्त्यांची दुरवस्था आणि वडखळ तसेच पोयनाड परिसरात लागणाऱ्या लांबलचक रांगांमुळे पर्यटकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते. खिशाला कात्री आणि वेळेचा अपव्यय यामुळे प्रवाशांची दुहेरी कोंडी होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >