Wednesday, May 13, 2026

Ashwini Bhide : देवनारमधील वीज निर्मिती दिवाळीपूर्वीच! महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

Ashwini Bhide : देवनारमधील वीज निर्मिती दिवाळीपूर्वीच! महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प हाती घेतला असून प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. बांधकाम व उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी बुधवारी सकाळही १३ मे २०२६ रोजी देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती (Power Generation at Deonar) प्रकल्पाची पाहणी करत प्रगतीचा आढावा घेतला. कचऱ्यापासून वीजनिर्मिती या प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ६०० मेट्रिक टन नागरी घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून सुमारे ८ मेगावॅट पर्यंत वीज निर्मिती होणार आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. बांधकाम व उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व कामांची पाहणी अश्विनी भिडे यांनी केली. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी अश्विनी भिडे यांच्या हस्ते प्रकल्प स्थळी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रकल्पाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण होईल असा विश्वास उपायुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केला.

आश्विनी भिडे यांनी देवनार बायो मायनिंग प्रकल्पाची पाहणी केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन कार्यवाहीचा आढावा घेतला. देवनार डम्पिंग सन १९२७ पासून कार्यरत असून क्षेपणभूमीचे क्षेत्रफळ सुमारे १२० हेक्टर आहे. देवनार डम्पिंग येथे सद्यस्थितीत सुमारे ६०० मेट्रिक टन इतका नागरी घनकचरा स्वीकारण्यात येतो. तसेच, १८५ लाख मेट्रिक टन इतका जुना साठलेला कचरा आहे. येथील साचलेल्या जुन्या घनकचऱ्यावर बायोमायनिंगचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत जुन्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करून त्यातून माती, पुनर्वापरयोग्य साहित्य व उर्वरित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे. बायोमायनिंगमुळे क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणीय प्रदूषणात घट होण्यास मदत होत आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत साधला आयुक्तांनी संवाद

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी एस विभागातील विक्रोळी (पूर्व) स्थित कन्नमवार नगर स्वच्छता कामगारांच्या चौकीस बुधवारी १३ मे २०२६ सकाळी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. तसेच, चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधत त्यांच्या उपस्थितीची नोंद, कामाचे स्वरूप, कामकाजाच्या वेळा, आवश्यक साहित्याचा पुरवठा तसेच उपलब्ध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. मुंबईतील रस्ते आणि त्याभोवतीचा परिसर, चौक स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे. कचरा साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन त्यांचे समूळ उच्चाटन करावे. त्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >