Thursday, May 14, 2026

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड परिसरात आता ग्रीन फेन्सिंग! दुर्गंधी रोखण्यासाठी ५००मीटरचा बफर झोन

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड परिसरात आता ग्रीन फेन्सिंग! दुर्गंधी रोखण्यासाठी ५००मीटरचा बफर झोन

महापालिका आयुक्तांनी केली विविध प्रकल्पांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवरील (Kanjurmarg Dumping Ground) नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून दुर्गंधी निर्माण होऊ नये, यासाठी नागरी वस्ती आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पादरम्यान पर्यावरणीय हरित पट्टा विकसित करून ५०० मीटर प्रभावी संरक्षक क्षेत्र (बफर झोन) निर्माण करण्याची कार्यवाही हाती घ्यावी. तसेच यासाठी कंत्राटदार, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या समर्पित कर्मचाऱ्यांची विशेष पथके कार्यरत ठेवावीत. रात्री १ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत दुर्गंधीची परिस्थिती तपासण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा तसेच तक्रार आल्यास त्वरित उपाययोजना कराव्यात, अशाप्रकारचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी दिले.

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी बुधवारी १३ मे २०२६ रोजी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड येथील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास अचानक भेट देत पाहणी केली. आणि तेथील कामकाजाचा आढावा घेतला. प्रारंभी, भिडे यांनी कचरा विलगीकरण केंद्र, खतनिर्मिती प्रकल्प स्थळ, वायूपासून वीजनिर्मिती केंद्र आणि बायो रिऍक्टर लँडफिल या ठिकाणांना भेट दिली. तसेच, आवश्यक सुधारणांबाबत विविध निर्देश दिले. उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर आदी उपस्थित होते.

कांजूर येथे एकूण ११८.१४ हेक्टर जमिनीवर (सुमारे २९२ एकर) नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. सद्यस्थितीत प्रति दिन सुमारे ५२०० मेट्रिक टन नागरी घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाद्वारे आणि १००० मेट्रिक टन नागरी घनकचऱ्यावर खत निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरी घनकचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूपासून काही प्रमाणात वीज निर्मिती होते. ही वीज याच प्रकल्पासाठी वापरण्यात येते. उर्वरित मिथेन वायू हा शास्त्रोक्त पद्धतीने जाळण्यात येतो. नागरी घनकचऱ्याचा हवेशी संपर्क होऊ नये व दुर्गंधी पसरू नये तसेच निर्माण होणारा वायू हवेत पसरू नये, याकरिता कचऱ्यावर मातीचे आवरण टाकण्यात येते. भिडे यांनी या विविध कामांची पाहणी केली.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी येऊ नये, यासाठी घनकचऱ्यावर 'एन्झाइम' चा समावेश असलेल्या रासायनिक द्रव्याची फवारणी केली जाते. तसेच, कचरा स्वीकारण्यात येणाऱ्या ठिकाणांच्या आजूबाजूला सुगंधी द्रव्याची फवारणी करण्यासाठी 'मिस्टींग'ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकल्पस्थळी ११ ठिकाणी सुगंधी द्रव्य फवारणीसाठी 'मिस्टींग' कॅननची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याचीही भिडे यांनी पाहणी केली. तसेच, सभोवतालच्या परिसरातून येणाऱ्या दुर्गंधीबाबत तक्रारीसाठी मदत सेवा क्रमांक (हेल्पलाईन) कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचादेखील आढावा घेतला.

कांजूर येथील कचरा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र हे बफर झोनमध्ये स्थलांतरित करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. प्रकल्पाचे स्थलांतरण आणि प्रकल्प स्थळाचे हरित पट्ट्यात रूपांतर करणे याबाबतचा कृती आराखडा सादर करावा. सार्वजनिक माहितीकरिता डिस्प्ले सुविधेसह सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र तातडीने स्थापित करावे,अशाप्रकारचे निर्देश भिडे यांनी दिले आहेत. हवेच्या गुणवत्तेवर अखंड व प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा सातत्याने वापर करावा. मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्या-ज्या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया केली जाते, त्या सर्व ठिकाणांची यादी तयार करावी. त्यासाठी हरित कुंपण (ग्रीन फेन्सिंग) योजना तयार करावी, जेणेकरून हे हरित कुंपण नागरी वसाहती आणि कचरा क्षेत्र यांच्यामध्ये 'बफर झोन' म्हणून कार्य करेल, असेही भिडे यांनी नमूद केले. यानुसार विशिष्ट झाडे तिथे लावली जाणार असून दुर्गंधी रोखण्यासाठी ५००मीटरचा परिसर बफर झोन म्हणून निश्चित करण्यात येणार असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >