Thursday, May 7, 2026

West Bengal : ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त, नव्या सरकारचा शपथविधी शनिवार ९ मे रोजी होणार

West Bengal : ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त, नव्या सरकारचा शपथविधी शनिवार ९ मे रोजी होणार

कोलकता : ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. आमचे सरकार बरखास्त करा पण मी राजीनामा देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. या सत्तासंघर्षांनंतर अखेर बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी पश्चिम बंगाल मंत्रिमंडळ बरखास्त केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यात मोठा घटनात्मक आणि राजकीय पेच निर्माण झाला असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता पश्चिम बंगालमधील सत्तांतराकडे लागले आहे.

तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीचा निकाल हा “जनादेश नसून कट” असल्याचा आरोप करत राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर, तृणमूल काँग्रेसचा पराभव जनतेच्या कौलामुळे नसून निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे झाला आहे. माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही भाजपशी नव्हे, तर भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाशी लढलो. बंगाच्या निवडणुकीत सुमारे १०० जागांवर मतदान प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोपही केला.

दरम्यान, राज्यघटनेनुसार विधानसभा कार्यकाळ संपल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन न झाल्यास राज्यपालांकडे विशेष अधिकार येतात. घटनातज्ज्ञांच्या मते, मुख्यमंत्री बहुमत गमावल्यानंतर किंवा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पश्चिम बंगाल मंत्रिमंडळ बरखास्त केल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्रीपद अधिकृतरीत्या संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे.

पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्तरावर विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी काम करण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दर्शवला आहे. त्या म्हणाल्या, “मी आता सामान्य नागरिक म्हणून लढणार आहे. मी रस्त्यावर उतरून अन्यायाविरोधात आंदोलन करेन.”

शपथविधी ९ मे रोजी? : दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षाची बैठक लवकरच होणार असून मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याची निवड केली जाणार आहे. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदान येथे ९ मे रोजी शपथविधी सोहळा होण्याची शक्यता असून, त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठ भाजप नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा