आयपीएलमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार
IPL 2026 : आज (७ मे) आयपीएल २०२६ मध्ये एकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार एका मोठ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आजचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना ठरणार असून, या टप्प्यापर्यंत पोहोचणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होणार आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.
स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा भुवनेश्वर कुमार यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याने ९ सामन्यांत १५.५३ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या असून सध्या पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचणारा तो आयपीएल इतिहासातील १२ वा खेळाडू ठरणार आहे. विशेष म्हणजे, २०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे.
विराट कोहलीकडूनही कौतुक
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यानेही भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. कोहलीच्या मते, भुवनेश्वर कुमार हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. भुवीने डावाच्या प्रत्येक टप्प्यात विकेट्स घेतल्या आहेत. निर्णायक क्षणी तो प्रभावी गोलंदाजी करतो. त्याचा इकॉनॉमी रेट आणि घेतलेल्या विकेट्स पाहता तो आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहे, असे कोहलीने म्हटले.
२०० किंवा त्यापेक्षा अधिक आयपीएल सामने खेळलेले खेळाडू
एमएस धोनी – २७८ रोहित शर्मा – २७७ विराट कोहली – २७६ रवींद्र जडेजा – २६४ दिनेश कार्तिक – २५७ शिखर धवन – २२२ आर अश्विन – २२१ अजिंक्य रहाणे – २०७ सुरेश रैना – २०५ रॉबिन उथप्पा – २०५ अंबाती रायुडू – २०४ भुवनेश्वर कुमार – १९९ (आज २०० वा सामना)
भुवनेश्वर कुमार आजचा सामना खेळल्यास आयपीएलमध्ये २०० सामन्यांचा टप्पा गाठणारा आणखी एक मोठा खेळाडू ठरणार असून त्याच्या या कामगिरीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे






