Wednesday, May 6, 2026

Nashik Crime : 'त्या' नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप', धमकी देत दोघींवर अत्याचार अन...

Nashik Crime : 'त्या' नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप', धमकी देत दोघींवर अत्याचार अन...

नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District and Seassion Court) आज एका नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा (Imprisonment) सुनावली आहे. इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दोन मुलींवर धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली होती, या प्रकरणात आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी चंदर दौलत गांगोडे (वय ३५, रा. डांगराळे, ता. सुरगाणा) यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

आरोपी चंदर गांगोडे याची २०२१ च्या दिवाळीपासून दोन्ही मुलींवर वाईट नजर होती. तुमचे दुसऱ्या मुलांसोबत संबंध आहेत, ते मी तुमच्या घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली. धमकीच्या बळावर त्याने मुलींना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर दोन्ही पीडित मुलींनी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पळून जात असताना एका मुलाने त्यांना हटकले आणि विचारपूस केल्यानंतर घडलेला सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयातील (Nashik District and Seassion Court) न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयात पार पडली.

सरकारी पक्षातर्फे अॅड. भानुप्रिया नितीन पेठकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने चंदर गांगोडे याला पोक्सो कलम सहा अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद आणि दोन्ही पीडितांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्ह्याचा तपास सुरगाणा पोलीस ठाण्याचे (Surgana Police Station) तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांनी केला होता. दोषसिद्धीसाठी पैरवी अंमलदार वैशाली भोर, विजय बेनके, श्रीकांत पाटील व अश्विनी परदेशी यांनी सहकार्य केले.

तर पुण्यातील पर्वतीच्या पायथा भागात ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणातला आरोपी हा तिचा आजोबा आहे. त्याने या मुलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. मात्र मुलगी ओरडू लागली आणि तेवढ्यात शेजारील महिला आणि इतर लोक तिच्या मदतीला धावले. ज्यानंतर हा प्रकार उघड झाला. मुलीची या सगळ्यांनी सुटका केली आणि तिच्या आजोबाला पोलीस येईपर्यंत पकडून ठेवलं होतं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांना दिलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >