Tuesday, May 5, 2026

thalapathy vijay : ....तेव्हा थलपती विजय यांनी आईवडिलांविरोधातच खटला दाखल केला होता ; काय घडलं होतं ?

thalapathy vijay  : ....तेव्हा थलपती विजय यांनी आईवडिलांविरोधातच खटला दाखल केला होता ; काय घडलं होतं ?

तमिळनाडू : मनोरंजन क्षेत्रानंतर आता राजकीय क्षेत्र गाजवण्यासाठी थलपती विजय सज्ज झाले आहेत. तमिळनाडूमध्ये विजय यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अवघ्या २ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. तमिळनाडूमध्ये विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाच्या झंझावातात अगदी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांनाच पराभवाचा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे विजय (thalapathy vijay) यांनी पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघांतून विजय मिळवला आहे. त्यांच्या पक्षाला 107 जागा मिळाल्या असून सरकार स्थापनेसाठी छोट्या पक्षांना बरोबर घ्यावं लागेल, असं चित्र आहे. पक्ष स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांत विजय यांना घवघवीत यश मिळालं असलं तरी त्यांना आधीपासूनच राजकारणात यायचं नव्हतं.

सुरुवातीला विजय यांना राजकारणात रस नव्हता. त्यामुळे जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना न सांगता त्यांच्या नवीन पक्षाचा भाग बनवला, तेव्हा त्यांनी थेट आईवडिलांसह 11 लोकांवर खटला दाखल केला होता. हे प्रकरण त्यावेळेस मोठ्या चर्चेत होते. नेमकं काय घडलं हे जाणून घ्या.

काय घडलं होतं ?

विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी 2020 मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. विजय मक्कल अय्यकम (व्हीएमआय) असं या पक्षाचं नाव होतं. या पक्षाचे महासचिव विजय यांचे वडील बनले आणि आई शोभा यांना खजिनदार बनवण्यात आलं होतं. या राजकीय पक्षाची सुरुवात करण्यासाठी विजय यांच्या वडिलांनी मुलाची कोणतीच परवानगी घेतली नव्हती. वडिलांनी मला त्यांच्या योजनांबद्दल स्पष्ट माहिती दिली असे सांगत सप्टेंबर 2021 मध्ये विजय यांनी व्हीएमआयपासून स्वत:ला वेगळं केलं. त्यानंतर त्यांनी थेट आईवडिलांसह 11 लोकांविरुद्ध खटला दाखल केला होता. त्यानंतर हा पक्ष भंग करण्यात आला होता.

विजय यांचे आई - वडील काय करतात ?

विजय यांचे वडील दिग्दर्शक आहे तर आई पार्श्वगायिका आहे. विजय यांनी बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या करिअरमधील पहिल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन वडिलांनीच केलं होतं. आज थलपती विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय नाव बनलं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या फॅन फॉलोईंगची प्रचिती सर्वांनाच आली होती. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुकच्या प्रशासनाविरोधातील रोष, नव्या पक्षाला संधी देण्याकडे कल तसंच महिलांचा विजयवरील विश्वास या मुद्द्यांसमोर उत्तर-दक्षिण वाद, हिंदी भाषावाद, द्राविडी अस्मिता हे द्रमुकचे प्रचाराचे मुद्दे फिके पडले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा