Tuesday, May 5, 2026

नाशिक : पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार

नाशिक : पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार

नाशिक : वडाळा नाका परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या या भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले आहे. तर घटनास्थळी बघ्यानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

नेमके काय घडले ?

ठाणे येथील आनगाव येथून सुरेश भोये हे सोमवारी (ता.४) सकाळी दुचाकी क्रमांक एम.एच ०४ एम.एल ४८८७ घेऊन निघाले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुंबई नाक्याकडून द्वारकेच्या दिशेने जात असताना वडाळा नाका परिसरातील हॉटेल कोर्ट यार्ड प्रवेशद्वारा बाहेर द्वारकाकडून मुंबई नाक्याकडे जाणारी पिकअप क्रमांक एम.एच १५ एफ.व्ही ९२९० यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहनाचे पुढचे चाक फुटले. अपघातात सुरेश भोये यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संशयित पिकअप चालक आझाद अन्सार शेख (रा. देवळाली गाव नाशिक रोड) यास ताब्यात घेण्यात आले आहे. सुरेश भोये याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनास्थळी बघ्यानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई नाका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच पिकअप चालकाची वैद्यकीय तपासणी करत पोलीस अधिक चौकशी करत आहे. तर दुसरीकडे मयत सुरेश यांच्या कुटुंबीयांना मुंबई नाका पोलिसांकडून माहिती देताच रात्री उशिरा ते शहरात दाखल झाले.

पार्किंग ठरतेय मृत्यूचा सापळा

वडाळा नाका ते मुंबई नाका सर्विस मार्ग अतिशय अरुंद आहे, असे असताना हॉटेलमध्ये येणारे नागरिक येथील रस्त्याच्या बाजूलाच वाहने उभी करतात. तसेच क्रेन व्यावसायिक आणि भंगार वाहनांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे क्रेन आणि भंगार वाहने येथीलच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी केलेली असतात. दोन्ही बाजूने वाहनांच्या असलेल्या पार्किंगमुळे रस्ता अरुंद होत आहे. त्यातच द्वारका भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने याच मार्गावरून वळविण्यात आलेली वाहतूक यामुळे अपघात घडत आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी रुग्णवाहिकेने चारचाकीस धडक दिल्याने वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. सोमवारी त्याच ठिकाणी पिकअप वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >