Sunday, May 24, 2026

Pune : चिमुरडीच्या आरोपीची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार; नवले पुलावरील आंदोलन थांबले, वाहतूक पुन्हा सुरू

Pune : चिमुरडीच्या आरोपीची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार; नवले पुलावरील आंदोलन थांबले, वाहतूक पुन्हा सुरू

पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी चिमुरडीच्या आईवडिलांना तसेच इतर नातलगांना दिली. यानंतर समजूत काढून स्वखुशीने गाडीत बसवून चिमुरडीच्या पालकांना आणि नातलगांना आंदोलनस्थळावरून नेण्यात आले. पण काही जणांना आंदोलन चिघळावे असे वाटत होते. यासाठी प्रयत्न झाले; अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलन शांत होऊ नये म्हणून काही जणांनी प्रयत्न सुरू केले. या मंडळींविरोधात पोलिसांनी बळाचा वापर केला. पण आंदोलन मोडण्यासाठी बळाचा वापर केलेला नाही, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

याआधी चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत तिचे पालक, नातलग आणि इतरांनी नवले पूल येथे आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. आंदोलकांनी पुणे - बंगळुरू महामार्गावर तब्बल चार तास रास्ता रोको केला. अखेर आंदोलन संपले आणि वाहतूक पोलीस बंदोबस्तात सुरळीत झाली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नसरापूर प्रकरणातील चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. पोलिसांनी परिस्थितीवर भरपूर प्रयत्न करून नियंत्रण मिळवले.

नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपीला घटनेनंतर दीड तासातच पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपीला सात मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

नेमके काय घडले ?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी घटनेनंतर दीड तासातच ६५ वर्षीय आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीचे बेकायदेशीर कृत्याचे जुने संदर्भही आढळले आहेत. आरोपीविरोधात पोक्सोसह (POCSO) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शिवाजीनगर कोर्टाने सात मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपीचे कृत्य अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असल्याचे सांगितले. आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला उच्च न्यायालयाला विनंती करू. शेष सरकारी वकील देऊन आरोपीसाठी मृत्यूदंडाची मागणी करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >