Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना अवघ्या २४ तासांत मोठे यश मिळाले आहे. २७ एप्रिल २०२६ ची ही घटना आहे. सकाळी साधारण सात वाजताच्या सुमारास वांद्रे पूर्वेकडील आरएनए (RNA) इमारतीजवळील पदपथावर एक वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. उपचारासाठी तिला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये 'अपमृत्यू'ची नोंद करण्यात आली होती. मात्र, सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठाण्यातून भानुदास विठ्ठल कांबळे (वय ४४) या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि या गुन्ह्यावरील पडदा उठला.



शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्हीतील तो 'अंधुक' चेहरा


या प्रकरणाला खरी कलाटणी मिळाली ती सायन रुग्णालयातून आलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर. या अहवालातून एक धक्कादायक वास्तव उघड झाले की, सदर महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा दाबण्यात आला होता, तसेच तिच्या डोक्यावर एखाद्या जड व बोथट वस्तूने गंभीर वार करण्यात आले होते. हा अहवाल हाती येताच २९ एप्रिल रोजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार घटनास्थळ आणि परिसरातील सरकारी व खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. या रात्रीच्या फुटेजमध्ये एका संशयित व्यक्तीची अंधुकशी हालचाल दिसली. विशेष म्हणजे, रात्री २ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास हाच इसम एक सीसीटीव्ही कॅमेरा फोडताना आणि त्यानंतर बीकेसी (BKC) रोडच्या दिशेने चालत जाताना कॅमेऱ्यात कैद झाला होता.



रात्रगस्तीवरील पोलिसांची सतर्कता ठरली महत्त्वाची


गुन्ह्याच्या रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेचा या तपासात अत्यंत मोठा फायदा झाला. गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार गणेश ठोंबरे, श्याम ठाकरे आणि शिपाई समीर कांबळे हे त्या रात्री गस्त घालत होते. रात्री साडेतीनच्या सुमारास बीकेसी रोडवरील मुंबई बँक परिसरात त्यांना सीसीटीव्हीतील वर्णनाशी मिळताजुळता एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरताना दिसला होता. पोलिसांनी त्याला हटकले असता, त्याने आपण महाराष्ट्र नगरमध्ये राहत असल्याची थाप मारली होती. तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि गस्तीवरील पोलिसांनी पाहिलेला इसम एकच असल्याची पोलिसांची खात्री पटली. त्यानंतर गुप्त खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करून या व्यक्तीचे खरे नाव भानुदास विठ्ठल कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. तो ठाणे (पश्चिम) येथील वर्तकनगर भागात वास्तव्यास असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.



क्षुल्लक रागातून हत्या आणि मृत महिलेची ओळख


पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी भानुदासने या भयानक गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली. २६ एप्रिलच्या रात्री तो वांद्रे पूर्व येथे एका हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. रात्री घरी परतत असताना आरएनए इमारतीजवळील पदपथावर तो लघुशंका करत होता. त्यावेळी तिथेच बसलेल्या एका वृद्ध महिलेने त्याला हटकले आणि शिवीगाळ केली. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या भानुदासने तिथे पडलेली एक वीट उचलून थेट महिलेच्या डोक्यावर प्रहार केला. रक्तबंबाळ अवस्थेतही महिला शिव्या देत असल्याने त्याने अत्यंत निर्घृणपणे दोन्ही हातांनी तिचा गळा आवळून तिची हत्या केली व तिथून पळ काढला. या तपासात मृत महिलेची ओळखही पटवण्यात आली; सौभाग्यअम्मा हनमंता कर्थीम्यनुर (वय ७८) असे त्यांचे नाव असून त्या धारावीतील शाहूनगर भागातील रहिवासी होत्या. त्या बेपत्ता असल्याची तक्रार २३ एप्रिल रोजी शाहूनगर पोलीस ठाण्यात आधीच दाखल होती. अप्पर पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, दत्ता नलावडे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा क्लिष्ट तपास अत्यंत वेगाने आणि यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.