Monday, April 20, 2026

BMC News : वांद्रे ते सांताक्रझ पूर्व परिसरात कारवाईचा धडाका, वांद्र्यातील जलवाहिनींचा विळखा सोडवला

BMC News : वांद्रे ते सांताक्रझ पूर्व परिसरात कारवाईचा धडाका, वांद्र्यातील जलवाहिनींचा विळखा सोडवला

मुंबई : सांताक्रुझ ते वांद्रे पूर्व भागातील अनेक भागांमधील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला असून मागील दहा ते बारा दिवसांमध्ये तब्बल सहा प्रभाग क्षेत्रांमध्ये मोठ्या स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. सांताक्रुझ पूर्व, खार पूर्व आणि वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरांमध्येही ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वांद्रे पूर्व येथील मोठ्या व्यासाच्या जलवाहिनींशेजारी झालेल्या अनधिकृत झोपड्यांवरही बुलडोझर चालवून जलवाहिनींना घालण्यात आलेला विळखा सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार मुंबईतील अनेक भागांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ तीनचे उपायुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली एच पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात मागील दहा ते बारा दिवसांमध्ये व्यापक कारवाई हाती घेतली. यामध्ये वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळी महापालिकेच्या जलवाहिन्यांशेजारी संरक्षक भिंतीच्या आतील बाजुस उभारलेल्या सुमारे १५ ते २० अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर चालवला आहे. जलवाहिनी पुन्हा विळखा घालणाऱ्या या झोपड्यांवर ही कारवाई करुन कच्च्या स्वरुपाच्या झोपड्या हटवण्यात आल्या.

याबरोबर या वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्व आदी भागांमधील विविध रस्ते व पदपथावरल कच्च्या स्वरुपातील झोपड्या, शेड व स्टॉल्स अशाप्रकारे एकूण ४६ बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पदपथावर पडलेल्या अडगळीच्या सामानीं विल्हेवाट लावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सेवा रस्त्यावरील अनेक बांबूंच्या कमानी, अडथळा, चौथरे, बेकायदेशी पार्किंग यावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरु असली तरी सांताक्रुझ पूर्व रेल्वे स्थानक, वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक, खार पूर्व रेल्वे स्थानक, टीपीएस ३मधील मुख्य रस्ते याठिकाणी नियमित कार्यवाही पुढे सुरु राहिल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

या कारवाईसाठी ०२ जेसीबी मशिन, ०३ डंपर, ०२ युटिलिटी वाहनांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली, यामध्ये १८ कामगार व मुकादम, १२ पोलिस शिपाई, ०५ कनिष्ठ अभियंते, ०४ दुय्यम अभियंते आदींनी भाग घेतला होता.

कोणत्या भागात महापालिकेने केली कारवाई

-जवाहर नेहरु रोड, सांताक्रुझ पूर्व रेल्वे स्थानक परिसर, गोळीबार ७वा रस्ता, टीपीएस ३मधील मुख्य रस्ते, पश्चिम द्रुतगती महामार्ग सेवा रस्ता

-धोबीघाट रोड, पटुक कॉलेज आणि दत्त मंदिर रोड, वाकोला, गीता विहार ते उमाचंद चौक,एअर इंडिया रोड, कुंचिकुरवे नगर, कलिना

-विजयनगर रोड, म्हाडा ऑफीस, पश्चिम द्रुतगती मार्ग सेवा रस्ता, भरत नगर रोड, दत्त मंदिर रोड

-मराठा कॉलनी, पटेल नगर, पश्चिम द्रुतगती मार्ग सेवा रस्ता

-पश्चिम द्रुतगती मार्ग सेवा रस्ता, गोळीबार रोड, खार स्टेशन

-अनंत काणेकर मार्ग, वांद्रे पूर्व, दक्षिण वाहिनी पश्चिम द्रुतगती मार्ग सेवा रस्ता, म्हाडा ऑफिस जवळील परिसर

Comments
Add Comment