तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होण्याची शक्यता वाढल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली असल्याचे जाहीर केले होते. पण काही दिवसांतच पुन्हा एकदा इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली आहे. इराणकडून भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने इराणच्या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. गोळीबाराच्या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांना बोलावून आपली चिंता व्यक्त केली. इराणच्या राजदूताने भारताचे म्हणणे आपल्या सरकारच्या कानी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा इराणचेच होर्मुझ सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण असल्याचे तसेच होर्मुझमार्गे होणारी जलवाहतूक ही इराणच्या परवानगी आणि सहकार्याविना अशक्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
इराण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणार नसेल तर अमेरिका बाहेरून कोंडी करून इराणमधून येणाऱ्या जहाजांना अडवेल असे अमेरिकेने जाहीर केले होते. प्रत्यक्षात अमेरिका त्यांच्या या प्रयत्नात अयशस्वी झाली आहे आणि इराण होर्मुझ सामुद्रनीवर नियंत्रण ठेवण्यात सातत्याने यशस्वी होताना दिसत आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात आली असून सर्व जहाजांची वाहतूक होईल असे जाहीर केले होते. तरी भारताच्या तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार झाला. यामुळे इराणी सैन्य आणि IRGC च्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्धाची ठिणगी पडली. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी शत्रू देश आणि त्यांना युद्धात थेट मदत करणाऱ्यांना बंद केली. यानंतर ८ एप्रिल रोजी होर्मुझ सामुद्रधुनी फक्त दहा मिनिटांसाठी खुली करण्यात आली, नंतर पुन्हा बंद करण्यात आली. यानंतर थेट १७ एप्रिल रोजी इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी झाल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सर्वांसाठी खुली करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पण इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी एक्स (X) वर पोस्ट केले की लेबनॉनमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडली जात आहे. नेमक्या याच पोस्टमुळे गोंधळ झाला.
In line with the ceasefire in Lebanon, the passage for all commercial vessels through Strait of Hormuz is declared completely open for the remaining period of ceasefire, on the coordinated route as already announced by Ports and Maritime Organisation of the Islamic Rep. of Iran.
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 17, 2026
सरकारी निर्णयाची माहिती IRGC च्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही अथवा त्यांची या निर्णयाला सहमती नव्हती. यामुळेच इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी जाहीर करूनही IRGC च्या अधिकाऱ्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी व्यावसायिक जलवाहतुकीसाठी खुली केलेली नाही. शिवाय होर्मुझमार्गे प्रवास करणाऱ्या जहाजांच्या दिशेने गोळीबार केला.
धक्कादायक म्हणजे भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. पण ज्या जहाजांवर गोळीबार झाला त्यातील एकात सुमारे २० दशलक्ष आणि दुसऱ्या जहाजात पाच दशलक्ष बॅरल कच्चे तेल आहे. मागे फिरा असा इशारा देत जहाजांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. थोडा गोळीबार होताच भारतीय जहाजांनी आधी परवानगी दिली होती याची आठवण करून दिली आणि मागे फिरण्याचा निर्णय घेतला. सध्या भारताची दोन्ही जहाजं सुरक्षित असून होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडून भारताच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी कधी नव्याने परवानगी मिळते याची वाट बघत आहेत.






