Sunday, April 19, 2026

Iran-US Peace Talks : इराण-अमेरिका शांतता चर्चेत प्रगती, पण अंतिम करार अजून दूर- मोहम्मद गालिबाफ

Iran-US Peace Talks : इराण-अमेरिका शांतता चर्चेत प्रगती, पण अंतिम करार अजून दूर- मोहम्मद गालिबाफ

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेची लवकरच शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इराणने सांगितले की अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेत काही प्रगती झाली आहे, मात्र अंतिम करार अद्याप खूप दूर आहे. कारण दोन आठवड्यांचा युद्धविराम बुधवारी संपणार आहे.

इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी शनिवारी दूरदर्शनवरील संबोधनात सांगितले की, अजूनही अनेक उणिवा आहेत आणि काही मूलभूत मुद्दे प्रलंबित आहेत. गालिबाफ म्हणाले, “आपण अजूनही अंतिम चर्चेपासून खूप दूर आहोत.” गत शनिवारी पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेत इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्वही गालिबाफ यांनीच केले होते. त्यांनी असेही सांगितले की, अनेक आठवडे चाललेल्या युद्धात इराण रणांगणावर विजयी राहिला आणि वॉशिंग्टनसोबत केवळ आपल्या मागण्या मान्य झाल्यामुळेच तात्पुरत्या युद्धविरामास सहमती दिली.

अमेरिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “आम्ही युद्धविराम स्वीकारला, कारण त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या होत्या.” गालिबाफ यांनी दावा केला की अमेरिका आपले उद्दिष्ट साध्य करू शकली नाही आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम आहे.ते पुढे म्हणाले की, शत्रूचा प्रत्येक प्रयत्न आमच्यावर त्याच्या मागण्या लादण्याचा होता. त्यामुळे आपल्या हक्कांची नोंद करून देणे आवश्यक आहे आणि म्हणूनच येथे चर्चा हा संघर्षाचाच एक मार्ग आहे. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे आणि त्याची लष्करी क्षमता संपवणे हे ट्रम्प यांचे उद्दिष्ट पूर्णपणे अपयशी ठरले. गालिबाफ यांनी असेही म्हटले की, “इराण हा व्हेनेझुएला नाही,” म्हणजेच बाहेरील दबावामुळे येथे सरकार बदलता येणार नाही.

इराणी संसदेच्या अध्यक्षांनी मान्य केले की लष्करी ताकदीच्या बाबतीत अमेरिका इराणपेक्षा अधिक बलवान आहे. मात्र त्यांनी ठामपणे सांगितले की, केवळ शस्त्रे, पैसा आणि संसाधने यावर विजय ठरत नाही. त्यांच्या मते, इराणने ‘असिमेट्रिक वॉरफेअर’ म्हणजेच वेगळी रणनीती अवलंबून शक्तिशाली शत्रूला मागे हटवले. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेबाबत त्यांनी सांगितले की, काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे, पण अजूनही अनेक मोठे मतभेद कायम आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, इराण आपल्या राष्ट्रीय हितांशी कोणतीही तडजोड करणार नाही आणि कूटनीतीत झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मोहम्मद गालिबाफ यांनी असा आरोपही केला की, अमेरिका ‘अमेरिका फर्स्ट’ची भाषा करते, पण प्रत्यक्षात ती इस्रायलच्या हितांना प्राधान्य देते आणि त्याच आधारावर निर्णय घेते. तथापि, प्रत्यक्ष परिस्थिती अजूनही तणावपूर्णच आहे. अलीकडील घडामोडींमध्ये होर्मुज सामुद्रधुनीबाबत वारंवार भूमिका बदलताना दिसत आहे. कधी ती खुली करण्याची घोषणा केली जाते, तर कधी पुन्हा बंद करण्याची चर्चा समोर येत आहे.

गालिबाफ आणि त्यांच्या शिष्टमंडळाने ११ एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली होती. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात उच्चस्तरीय संपर्क मानला जात आहे. मात्र, या चर्चेत कोणताही अंतिम करार होऊ शकला नाही. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या पुढील चर्चेच्या फेरीसाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >