दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतरचा काळ हा मुलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात अनेकदा पालक मुलांवर पुढील शिक्षण किंवा करिअर निवडीबाबत दबाव टाकतात. मात्र, कितीही झाले तरी मुलांवर सक्ती करू नये. प्रत्येक मुलाची आवड, क्षमता आणि स्वप्ने वेगळी असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परीक्षा संपल्यानंतर काही काळ मुलांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. मुलांना आपले करिअर निवडताना पालकांनी एक मार्गदर्शक म्हणून काम करायला हवे.
मुलांच्या जीवनात दहावी आणि बारावीच्या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या असतात. याच परीक्षा मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणाच्या दिशा ठरवून देतात. त्यासाठी आता मुलांच्या परीक्षा संपल्या असल्या तरी पालकांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत असे म्हणता येईल. मुलांचे करिअर घडविताना मुलांच्या आवडीनिवडी पालकांना जास्त माहीत असतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या करिअरची दिशा ठरवू शकतात. याचा परिणाम मुलांचा व पालकांचा वेळ, पैसा व श्रम वाचण्याला मदत होते. तो वेळ, पैसा व श्रम यांचा इतर ठिकाणी वापर करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलांचे करिअर निवडताना पालकांना योग्य नियोजन करावे लागते. त्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा मुलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात. तेव्हा मुलांचे करिअर निवडताना पालकांनी मुलांवर सक्ती करू नये. त्यांच्या सुद्धा आवडीनिवडीचा विचार करावा. तेव्हा पालकांनी मुलांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर मुलांनी सुद्धा करू नये. त्याचबरोबर मुलांनी आपला शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी पालक अथक प्रयत्न करीत असतात, हे विसरून चालणार नाही. त्यासाठी मुले आणि पालक यांच्यात वेळच्यावेळी अभ्यासाच्या संदर्भात चर्चा होणे गरजेची आहे. डॉक्टरला वाटते माझी मुले डॉक्टर व्हावीत, वकिलाला वाटते माझी मुले वकील व्हावीत, शिक्षकाला वाटते माझी मुले शिक्षक व्हावीत, मात्र माझे असे मत आहे, ज्या क्षेत्राची आवड मुलांना असेल त्या क्षेत्रात त्यांनी करिअर करावे. तशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. म्हणजे मुले आणि पालक यांच्यामध्ये विचारविनिमय होणे गरजेचे आहे. शक्यतो भविष्याच्या दृष्टीने एक वाक्यता हवी. बरीच मुले नंतर पालकांना दोष देतात. काही मुले पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना मदत करत अभ्यास करतात आणि आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या आवडीनिवडी पू्र्ण करण्याचा प्रयत्न करतात. यात अनेक मुलांना यश आले आहे.
पालकांनी आपल्या मुलांच्या करिअरचा विचार करत असताना एक मित्र आणि मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका मुलांसमोर मांडावी. तेव्हाच मुलांच्या खऱ्या अर्थाने जीवनाला सुरुवात होत असते. यातच पालकांची खरी परीक्षा असते. काही पालक करिअर मार्गदर्शक केंद्रावर आपल्या मुलांना घेऊन जातात. यामुळे कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत किंवा कोणत्या शाखेची निवड केल्यावर आपल्याला कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात याची पूर्वकल्पना मुलांना येते. त्यामुळे अभ्यासक्रम निवडणे सोपे जाते.
आता खऱ्या अर्थाने पालकांची परीक्षा सुरु झाल्याने आपल्या मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन मुलांना त्यांचे करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करावे. मात्र सक्ती करू नये. एखादा मार्ग कठीण वाटत असेल तर सोप्या भाषेत समजवून सांगा म्हणजे त्या क्षेत्रातील आवड निर्माण होऊन आपले करिअर करू शकतो. त्यासाठी योग्यवेळी करिअर मार्गदर्शनाची गरज असते. काही मुले आपल्या मित्राने जी शाखा निवडली त्यामुळे तो त्या शाखेकडे जातो, असे बऱ्याच मुलांचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. करिअरच्या दृष्टीने मुलांना शाखा निवडणे, त्याविषयी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांच्या जीवनात हा महत्त्वपूर्ण निर्णय असतो. त्यासाठी सेवक तत्त्वावर होणारी भरती रद्द करून सरळ सेवा भरती करणे जास्त हिताचे ठरणार आहे. आज अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांची परिस्थिती गृहीत धरल्यास घरात एक व्यक्ती कमावणारी असते आणि चार लोक खाणारे असतात. त्यात अधूनमधून नातेवाइकांचा सुद्धा समावेश असतो. वाढत्या महागाईचा विचार केल्यास कंत्राटी पद्धतीमुळे त्यांचा जीव टांगणीला आलेला असतो. त्यामुळे आताच्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शासन स्तरावर देखील रोजगाराच्या वेगवेगळ्या नवीन संधी निर्माण करता आल्या पाहिजेत. असे असले तरी उन्हाळी सुट्टीत मजा करत असताना आतापासून आपली आवड लक्षात घेऊन करिअरचे नियोजन केले पाहिजे. जेणेकरून भविष्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा क्षेत्राकडे वळावे. त्यासाठी विविध क्षेत्रांचा अभ्यास करावा लागेल. तसेच इयत्ता सातवी आणि आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने विचारविनिमय करावा. म्हणजे दहावी आणि बारावीनंतर पुढे काय करता येईल याचे उत्तर अधिक सुलभरीत्या त्यांना मिळू शकते. आपण पाहिले तर बऱ्याच वेळा मुले परीक्षेच्या काळात तणावग्रस्त असलेले दिसतात. अभ्यास नीट न झाल्याने पास होऊ की नापास याची मुलांना अधिकच भीती असते. तसेच या तणावाखाली येऊन अनेक मुले आत्महत्या करण्याचा पर्याय निवडतात, आपल्याला परीक्षेत कमी गुण मिळाले तर पुढे काय करायचे? असे अनेक प्रश्न मुलांना सतावत असतात. त्यामुळे मुलांना तणाव निर्माण होतो. अशावेळी पालकांनी मुलांना धीर दिला पाहिजे. परीक्षा काळात मुलांच्या अभ्यासासाठी घरात शांतता हवी. तसेच त्याने एकाग्रतेने अभ्यास करायला हवा असे वातावरण निर्माण केले गेले पाहिजे. मुलांच्या आहाराकडे आणि त्यांच्या विश्रांतीकडे लक्ष द्यावे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतरचा काळ हा मुलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात अनेकदा पालक मुलांवर पुढील शिक्षण किंवा करिअर निवडीबाबत दबाव टाकतात. मात्र, कितीही झाले तरी मुलांवर सक्ती करू नये. प्रत्येक मुलाची आवड, क्षमता आणि स्वप्ने वेगळी असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परीक्षा संपल्यानंतर काही काळ मुलांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. त्यानंतर शांतपणे आणि खुलेपणाने पालक व मुलांनी एकत्र बसून पुढील वाटचालीबाबत चर्चा करावी. मुलांची एकमेकांशी वारंवार तुलना करणे टाळावे. मुलांना काय आवडते, त्यांची ताकद काय आहे, त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पालकांची भूमिका केवळ निर्णय लादण्याची नसून योग्य मार्गदर्शन करण्याची असते. मुलांना आपले करिअर निवडताना पालकांनी एक मार्गदर्शक म्हणून काम करावे. मुलांना विविध पर्यायांची माहिती देणे, त्यांचे फायदे-तोटे समजावून सांगणे आणि त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणे हे अधिक गरजेचे आहे. मुलांचे करिअर हा त्यांच्या आयुष्याचा दीर्घ प्रवास आहे. त्या प्रवासात योग्य दिशा दाखवणे, त्यांना आत्मविश्वास देणे आणि त्यांच्या निवडीचा आदर करणे हीच पालकांची खरी परीक्षा आहे.