Wednesday, April 15, 2026

Navnath Ban PC : संजय राऊत उबाठा हायजॅक करणार, नवनाथ बन यांचा गौप्यस्फोट

Navnath Ban PC : संजय राऊत उबाठा हायजॅक करणार, नवनाथ बन यांचा गौप्यस्फोट

मुंबई : उबाठा गटात आता आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत ही थेट लढत पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवण्याची तयारी उबाठा गटात सुरू असल्याबद्दल मला माहिती नाही, असे संजय राऊत सांगत आहेत. हे निर्णय पक्षात होतात मग संजय राऊत तुम्ही पक्षाबाहेर आहात का ? उद्धव ठाकरे यांच्यानंतर उबाठा गटाची धुरा आपल्याकडेच यावी यासाठी संजय राऊत प्रयत्नशील असून त्यासाठी एक गट हाताशी धरून ते प्रयत्न करत असल्याचा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत यांचा आदित्य ठाकरे यांना पूर्ण विरोध असून ते कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी त्यांचा गट कार्यरत आहे. त्यातूनच 'आदित्य ठाकरे घरी बसतात, ते महाराष्ट्रात फिरत नाहीत' अशा वावड्या पसरवण्याचे कामही संजय राऊत गटातल्या काही खासदारांकडून दिल्लीत बसून केले जाते. कारण संजय राऊत यांना स्वतःला पक्षप्रमुख व्हायची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर उबाठा गटाची धुरा स्वतःकडे ठेवण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील असल्यानेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना कुठलीही कल्पना न देता परस्पर कार्याध्यक्ष बनण्याची रणनीती आखली आहे. आता आदित्य ठाकरे यांचा गट विजयी होतो का संजय राऊत यांचा गट हे पहावे लागेल. येत्या दीड वर्षात संजय राऊत यांच्या खासदारकीची मुदत संपते आणि त्यावेळी आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष असतील तर संजय राऊत यांना पुढची खासदारकी आणि पुढचे मुख्य प्रवक्तेपदही मिळणार नाही. त्यामुळे संजय राऊत यांचा पत्ता कट होणार आहे असल्याने त्यांचा या सगळ्या प्रकरणाला विरोध आहे, असे बन म्हणाले.

मतदारसंघ वाढल्यामुळे देशात आग लागणार नाही तर विरोधी पक्षांमध्ये आग लागलेली असल्याचे सांगून बन म्हणाले की, विरोधी पक्षाची अवस्था काय होणार हे येणाऱ्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल. संजय राऊत, तुमच्या बुडाखाली आग लागलेली आहे. कारण तुम्हाला महाराष्ट्रात लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार मिळाले नव्हते. आता येत्या काळात आठशे खासदार होतील तेव्हाही उबाठा गटाला उमेदवार मिळणार नाहीत याची चिंता संजय राऊत यांना आहे.

संजय राऊत, महाराष्ट्राची फाळणी होणार नाही. फाळणी तुमच्या पक्षाची झाली आहे. त्याकडे लक्ष द्या. चारशे आमदार कुठे बसणार असा प्रश्न संजय राऊत यांना पडतोय. लोकसभेत आता जवळपास साडेपाचशे खासदार आहेत मग महाराष्ट्राच्या विधानसभेत चारशे आमदार बसायला काय अडचण आहे? तुमच्या पक्षाचे दोन तुकडे पडले ते तुकडे तुम्हाला सांभाळता आले नाहीत. तुम्ही महाराष्ट्राच्या फाळणीबद्दल गप्पा करू नका. तो तुम्हाला अधिकार नाही. महाराष्ट्र हा एक संघ आहे आणि एक संघच राहील, असे बन यांनी ठणकावून सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा