Monday, April 13, 2026

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. वीर जलाशयातून मुळा जलाशय येथे स्थलांतरित झालेल्या पिंजरा मत्स्य संवर्धन करणाऱ्या लाभार्थ्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष 'क्लस्टर' निर्माण करण्याची संकल्पना मंत्री राणे यांनी सोमवारी मांडली. या माध्यमातून तिलापिया माशांच्या कातडीपासून (स्किन) पर्स तयार करण्यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना शासन स्तरावर बळ देण्याबाबत चर्चा झाली.

मत्स्य शेती करणाऱ्या मागासवर्गीय लाभार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत नितेश राणे बोलत होते. यावेळी मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचा नफा कसा वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शेतकरी गटाने तिलापिया माशांच्या कातडीपासून तयार केलेल्या पर्स आणि इतर शोभिवंत वस्तूंचे सादरीकरण केले. तसेच तिलापिया माशांपासून बनवलेले फिश फिंगर, फिश बर्गर आणि फिश मोमोज यांसारख्या प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांची माहितीही मंत्र्यांनी घेतली.

मत्स्य उत्पादक थेट उद्योजक बनतील – नितेश राणे

मत्स्य शेतकऱ्यांच्या या प्रयोगाचे कौतुक करताना नितेश राणे म्हणाले की, "मत्स्य उत्पादनांपासून उपपदार्थ तयार करून त्यांचे मूल्यवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या मत्स्य शेतकऱ्यांचा एक स्वतंत्र क्लस्टर तयार करून त्याअंतर्गत मत्स्य मूल्यवर्धन कारखाना व इतर पूरक प्रकल्प राबवण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील मत्स्य उत्पादक आता थेट उद्योजक बनू शकतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, क्लस्टरचे प्रतिनिधी नकुल अविनाश सदाफुले आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा