Monday, April 13, 2026

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा , जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी , वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाकडून त्याचे स्मरण करताना हा उपक्रम या जलयात्रेच्या निमित्ताने राबविला जाणार आहे.

२५ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होईल आणि या यात्रांचा संगम शिर्डी येथे होणार असून तेथून छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वर, धुळे या मार्गाने इंदूर येथे २९ एप्रिल रोजी समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव

लघु कालव्यांचे जाळे उभारणे, पाणी साठवण आणि जलसंवर्धन, शेतीपूरक विकास, स्थानिक रोजगार आणि कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे. अहिल्यादेवींनी हे तत्त्व अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी आचरणात आणले होते. अहिल्यादेवींनी गरीब, वंचित, शेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून शासन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला असून या कालावधीत विविध उपक्रम देशभरात आयोजित करण्यात आले आहेत.

  1. स्मारक नाणे व टपाल तिकीट प्रकाशन
  2. महिला सक्षमीकरण, सुशासन व वारसा संवर्धनाशी निगडित उपक्रम
  3. प्रदर्शने, प्रकाशने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम.
  4. विविध राज्ये, संस्था यांच्यावतीने विविध कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर आयोजन केले गेले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >